पुणे (Pune) : कायम दुष्काळी समजले जाणारे पुणे जिल्ह्यातील (Pune District) बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि शिरूर (Baramati, Indapur, Daund, Purandar & Shirur) हे पाच तालुके यंदा भर उन्हाळ्यातही टॅंकरमुक्त आहेत. तेथील एकाही गावाला किंवा वाडी-वस्तीला आतापर्यंत टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागलेले नाही.
गेल्या दोन दशकांनंतर यंदा प्रथमच असे घडले आहे. याशिवाय मावळ, मुळशी आणि वेल्हे या तीन तालुक्यांत मागील पाच वर्षांपासून टँकर पूर्णपणे बंद झालेले आहेत.
सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकूण नऊ तालुके टँकरमुक्त आहेत. यात वरील पाच तालुक्यांसह हवेली, मावळ, मुळशी आणि वेल्हे या अन्य चार तालुक्यांचा समावेश आहे. सध्या केवळ आंबेगाव, जुन्नर, खेड आणि भोर या चारच तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर सुरू झालेले आहेत.
पुणे जिल्हा यंदा तीव्र पाणीटंचाईच्या गडद छायेतून पूर्णपणे बाहेर आला असल्याचे दिसून आले आहे. दोन दशकांपूर्वी २००३ आणि २००४ या वर्षांत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या एकूण टँकर्सची संख्या साडेतीनशेच्या घरात होती. यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजेच दोनशेहून अधिक टँकर्स हे फक्त दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पाच तालुक्यांत असत, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
टॅँकर कमी होण्याची प्रमुख कारणे
- जलसंधारणाच्या कामात झालेली वाढ
- गाव आणि पाझर तलावांतील गाळ काढल्याने पाणीसाठ्यात वाढ
- जलयुक्त शिवारच्या कामांचा फायदा
- मातीबंधारे, नाला बंधाऱ्यांची निर्मिती
- पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम
- भूजलाचा वाढता पुनर्वापर.
- भूजल उपशावर नियंत्रण
- वर्षभर पडणारा अवेळी पाऊस
- शेतीच्या पाणी वापरात सुक्ष्म सिंचनामुळे होणारी पाणी बचत.
पुणे जिल्ह्यात फक्त ३२ टँकर
यंदाच्या उन्हाळ्यातही पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये मिळून फक्त ३२ टँकर सुरू झाले आहेत. सर्वाधिक १२ टॅंकर फक्त आंबेगाव तालुक्यात सुरू आहेत. जुन्नर तालुक्यात दहा, खेडमध्ये नऊ तर, भोर तालुक्यात केवळ एक टँकर सुरू आहेत. या सर्व टॅँकर्सच्या माध्यमातून १६ गावे आणि ५० वाड्या-वस्त्यांमधील १८ हजार ५४० लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.