पुणे (Pune) : राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या चौफुला-न्हावरे या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, रुंदीकरणाच्या मंजूर कामाला तातडीने वेग देण्याची मागणी आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली.
दौंड तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामासाठी कुल यांनी गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या वेळी, पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते कासुर्डी टोलनाक्यापर्यंत उन्नत महामार्ग (Elevated Highway) उभारण्यासंदर्भात प्रस्तावास मान्यता देऊन सदर कामाची टेंडर प्रक्रिया राबविण्यात यावी, पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस, मळद, खडकी, स्वामी चिंचोली येथे ठिकठिकाणी सेवा रस्त्याचे काम करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यास मान्यता देऊन कामे सुरू करावीत, अशी मागणी केली.
रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे-सोलापूर महामार्गावरील वाखारी, धायगुडेवाडी, भागवतवाडी तसेच कुरकुंभ येथील धोक्याची व अपघातप्रवण क्षेत्र निश्चित करून तयार असलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड येथे अतिरिक्त अंडरपास करावा. केंद्रीय रस्ते निधीद्वारे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर खोरोडी येथे रेल्वे अंडर ब्रिज उभारावा, अशा मागण्या कुल यांनी केल्या. त्याला गडकरी यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.