पुणे (Pune) : संभाजी पोलिस चौकीच्या मागे होर्डिंग उभारले जात असताना तेथे नियमानुसार काम सुरू आहे की नाही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह परवाना निरीक्षकांवर कारवाई केली जाणार आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी ही माहिती दिली.
टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागच्या बाजूला तीन होर्डिंगला परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या नियमावलीमध्ये होर्डिंग उभारताना प्रत्येक होर्डिंगमध्ये कमीतकमी एक मीटरचे अंतर आवश्यक आहे, ते एकमेकांशी जोडून उभारले जाऊ नयेत असे नमूद केले आहे. पण या ठिकाणी तीन होर्डिंग एकमेकांशी जोडून उभारले आहेत. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर आकाश चिन्ह विभागाने या कामाचा अहवाल मागविला होता, पण हा अहवाल समाधानकारक नसल्याने अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार, उपायुक्त माधव जगताप यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
त्यामध्ये त्यांना होर्डिंग उभारणीसाठी नदीत राडारोडा टाकणे, झाड तोडणे, होर्डिंगमध्ये अंतर न ठेवणे यासह इतर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. या होर्डिंगची उभारणी करताना कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक, सहय्यक आयुक्तांनी लक्ष दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असे खेमनार यांनी सांगितले.
राडारोडा पुन्हा नदीतच
होर्डिंगचे काम करताना क्रेनसाठी नदीपात्रात सपाट जागा नसल्याने मोठ्याप्रमाणात राडारोडा टाकला होता. अधिकाऱ्यांनी जागा पाहणी केल्यानंतर राडारोडा उचलण्याचे आदेश संबंधित होर्डिंग व्यावसायिकास दिले होते. पण या ठिकाणचा राडारोडा उचलून पुन्हा नदी पात्रातच टाकला जात असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पत्र दिले असल्याचे उपायुक्त आशा राऊत यांनी सांगितले.