पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्त्यांची पावसामुळे चाळण झाली असून त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. खड्डे, त्यामध्ये साचलेले पाणी आणि त्याभोवतीच्या खडी, मातीमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. मात्र महापालिकेकडून (PMC) अद्यापही खड्डे दुरुस्तीच्या कामाला वेग दिला जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांसह उपनगरांमधील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मध्यवर्ती भागातील पेठा, कात्रज, आंबेगाव, नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता), मॉडेल कॉलनी, स्वारगेट, हडपसर, कँटोन्मेंट, कोथरूड, कर्वेनगर, खडकी, बोपोडी, औंध, बाणेर, पाषाण, कोंढवा, मुंढवा, कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, येरवडा यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
खड्ड्यांमधून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहेत. त्यातच खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने आणि त्याभोवती खडी, माती आल्याने दुचाकींच्या अपघाताच्या घटना घडत आहेत.
प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे तयार झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काँक्रिट रस्त्यांमध्ये फटी तयार झाल्या आहेत. महापालिकेच्या देखभाल-दुरुस्ती व्हॅनद्वारे काही ठिकाणी खड्डे दुरुस्तीचे काम केले जात आहे. मात्र, खड्ड्यांची संख्या मोठी असल्याने दुरुस्तीच्या कामाला वेग येत नसल्याचे दिसत आहे.
मॉडेल कॉलनी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांचे अपघात घडत आहेत. त्यामुळे खड्डे दुरुस्ती त्वरित झाली पाहिजे.
- किरण साखरे, नागरिक
नागरिकांच्या तक्रारी व पथ विभागाच्या प्रत्यक्ष पाहणीवेळी निदर्शनास आलेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती केली जात आहे. हॉटमिक्स प्लांटमधील डांबर मिळण्यास अडचण येत आहे. मात्र उपलब्ध डांबरातून शास्त्रीय पद्धतीने खड्डे दुरुस्तीचे काम केले जात आहे. नागरिकांनी खड्ड्यांची माहिती दिल्यास तातडीने दखल घेतली जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथविभाग, महापालिका