पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road) वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कृषी महाविद्यालयातून तात्पुरत्या स्वरूपात होणाऱ्या पर्यायी रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात झाली आहे.
रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर रेंजहिल्स, बोपोडी, खडकीकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार असल्याने गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे, मात्र त्यासाठी वाहनचालकांना दीड महिने वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंद ऋषीजी महाराज चौकासह गणेशखिंड रस्त्यावरील बहुमजली उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प व रस्ता रुंदीकरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी कृषी महाविद्यालयातील रस्त्याचा वापर करण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र या रस्त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होण्याची तसेच प्रशिक्षण वर्ग, शेती, प्रात्यक्षिक क्षेत्र या सगळ्यांनाच फटका बसण्याची शक्यता होती.
विद्यार्थ्यांनीही या रस्त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर शनिवारी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका, कृषी महाविद्यालय व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्यायी रस्त्यासाठी नवीन रस्ता सुचविण्यास सांगितले होते.
साखर संकुल येथील महामेट्रोच्या प्रवेशद्वारापासून कृषी महाविद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील अंडी उबवणी केंद्राजवळील लोहमार्ग पुलाखालून पुढे जाणाऱ्या रस्त्याचा पर्याय मांडण्यात आला. त्यास सर्व विभागांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरूवात करण्यात आली आहे. पर्यायी रस्त्यासाठी उपलब्ध झालेल्या जागेत संपूर्ण नवीन रस्ता करावा लागणार आहे.
एक ते दीड किलोमीटर अंतराचा हा रस्ता असेल. कृषी महाविद्यालय व महामेट्रोच्या सीमाभिंतीलगतच्या या परिसरात कृषी महाविद्यालयाची शेती आहे. त्यामुळे सध्या माती काढण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर सपाटीकरण, मुरूम, मातीचा भराव त्यानंतर डांबरीकरण करावे लागणार आहे.
‘पीएमआरडीए’ मार्फत संबंधित काम करण्यात येत असून त्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे ‘पीएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.