पुणे (Pune) : वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना कराव्या लागणाऱ्या गणेशखिंड रस्त्यावर आता भुयारी मार्ग करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यामुळे वाहनचालकांना सिग्नलच्या अडथळ्याशिवाय गणेशखिंड रस्त्यावरून प्रवास करता येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. त्यासाठीचे काम अल्पावधीत सुरू होणार आहे.
गणेशखिंड रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकात दुहेरी उड्डाणपुलाचेही काम केले जाणार आहे.
दरम्यान, या रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची शक्यता आहे. तरीही, वाहनचालकांना सेंट्रो मॉलजवळील हरे कृष्ण पथ, कृषी महाविद्यालयासमोरील उड्डाणपूल व शिवाजीनगर येथील चौकामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
वाहनचालकांचा हा त्रास कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गणेशखिंड रस्त्यावर दोन ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर प्राथमिक चर्चा झाली आहे. नोव्हेंबरमध्ये या कामाला गती देण्यात येईल.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार याबाबत म्हणाले, ‘‘शिवाजीनगर येथे मेट्रो स्थानक होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, वाहनचालकांना सिग्नलच्या अडथळ्याशिवाय पुढे प्रवास करता यावा, याचा विचार महापालिका प्रशासनाकडून केला जात होता.
त्यानुसार, गणेशखिंड रस्त्यावरील हरे कृष्ण पथ, शिवाजीनगर चौकामध्ये भुयारी मार्ग केले जाणार आहे. पुढे संचेती रुग्णालयासमोरील चौकात भुयारी मार्ग आहे. त्यामुळे या तिन्ही चौकातून वाहनचालकांना विनाअडथळा प्रवास करता येईल.’’
सेनापती बापट रस्ता उड्डाणपुलाचे काम होणार सुरू
सेनापती बापट रस्त्यावरून गणेशखिंड रस्त्याला जोडणारा उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाचे काम पुढील वर्षापासून सुरू होऊ शकते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यासही मदत होणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.