पुणे (Pune) : पुणे शहराच्या दक्षिण भागात कात्रज-कोंढवा परिसरात भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी आणि येवलेवाडीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या भागात अनेक छोटे-मोठे डोंगर व टेकड्या आहेत. जैवविविधतेने नटलेला हा परिसर आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात हाहाकार उडविणाऱ्या आंबिल ओढ्याचे हेच उगमस्थान आहे. या भागातील निसर्गाचे दृश्य कायम मनमोहक असते. परंतु हे दृश्य लोप पावते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. टेकड्यांवर अतिक्रमण होऊन लोकवस्त्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवानग्या न घेता अनधिकृत बांधकामे करण्यात येतात. डोंगर भागालगत असलेल्या डोंगरउतार असलेल्या भागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असताना बांधकाम विभाग व अतिक्रमण निर्मुलन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
अनधिकृत बांधकामांवर ताबा ठेवण्याची गरज असताना बांधकाम विभाग दुर्लक्ष करतेय की काय, अशी शंका निर्माण होते. या ठिकाणी अनेक बांधकाम व्यावसायिकांचा ताबा असल्याचे दिसून येते. येवलेवाडीसारख्या भागात अनेक ठिकाणी उत्खनन सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे टेकडीचा भाग धोक्यात आहे. अज्ञातांकडून आग लावण्याचे आणि झाडे तोडण्याचे प्रकार होत असतात. मात्र, याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होताना दिसते. टेकड्या व पर्यावरण टिकवायचे असेल तर प्रशासनाने लक्ष घालणे खूप महत्त्वाचे असल्याचे दिसून येते.
डोंगरभागांचा फायदा करून निसर्गरम्य वातावरणात रहायला सर्वांनाच आवडते. परंतु त्यांची काळजी घेताना कोणीही दिसत नाही. अनेकवेळा जंगलाला जाणीवपूर्वक आग लावल्याचे दिसून येते. निसर्गाचा मान राखण्याचे काम कोणीही करताना दिसत नाही. महापालिकाही अनधिकृत बांधकामावर हवा तसा ताबा ठेवताना दिसत नाही. त्यामुळे हा निसर्गरम्य भाग लुप्त पावतो की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
- किरण भंडारी, पर्यावरणप्रेमी