पुणे (Pune) : पुणे महापालिकेमधील (PMC) विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी (Recruitment) सुमारे नऊ हजार अर्ज आले आहेत. पहिल्या टप्प्यात प्रतिसाद न मिळाल्यामुळे महापालिकेने नोकरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली होती. त्यास उमेदवारांनी चांगला प्रतिसाद दिला.
महापालिकेच्या आस्थापना विभागामध्ये एक ते तीन या संवर्गासाठी सरळसेवा भरती करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यानुसार आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशामक अशा विविध प्रकारच्या तब्बल ३२० जागांसाठी महापालिकेने अर्ज मागविले होते.
महापालिकेने सरळसेवा भरतीअंतर्गत सहा मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात त्यास पाच हजार ३२९ इतक्या कमी प्रमाणात उमेदवारांकडून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महापालिकेने २८ मार्चनंतर पुन्हा एकदा विविध पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती.
मुदतवाढ दिल्यामुळे उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. त्यानुसार आतापर्यंत सुमारे आठ हजार ८५९ उमेदवारांनी महापालिकेकडे अर्ज दाखल केले आहे.
या पदांसाठी प्रक्रिया...
महापालिकेने यापूर्वी ४४८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. त्यानंतर महापालिकेच्या रिक्त जागांसाठी आणखी एकदा भरती प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, ३२० पदांसाठीच्या दुसऱ्या भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत आठ हजार ८५९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
त्यामध्ये आतापर्यंत फायरमन ३,२४६, फार्मासिस्ट २,५८१, मेडीकल ऑफिसर ३५४, ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीक) १,४८१, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक १७५, आरोग्य निरीक्षक ५८४ अशाप्रकारे विविध पदांसाठी अर्ज दाखल झाले आहेत.
अर्ज दाखल करण्यासाठी १३ एप्रिलपर्यंत मुदत आहे. त्यामुळे दहा हजाराहून अधिक अर्ज दाखल होऊ शकतात, असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले