पुणे (Pune) : सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येऊन दस्तनोंदणीसह विविध प्रकारचे सर्च घेण्यात अडथळे येतात. त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्राच्या (NIC) कार्यालयात एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्यानंतर दोन्ही विभागाचे अधिकारी तातडीने त्या दूर करून व्यवहार सुरळीत ठेवण्यात मदत होणार आहे.
राज्यात दररोज साडेनऊ ते दहा हजार दस्तांची नोंदणी होते, तर अडीच ते तीन हजार ऑनलाइन भाडेकरार नोंद होतात. सण, उत्सव आणि विशेष दिवशी मालमत्ता खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, अनेकवेळा सर्व्हरवर ताण येऊन दस्त नोंदणी बंद पडते किंवा सर्व्हर धीम्यागतीने काम करतो. अनेकदा सर्च रिपोर्ट तयार करण्यासाठी अडचणी येतात.
याबाबतच्या तक्रारी नोंदणी विभागाकडे येत आहेत. त्यांची माहिती ‘एनआयसी’ला दिली जाते. त्यानंतर शोध घेऊन दुरुस्ती केली जाते. अनेकदा त्यामध्ये विलंब होतो. त्यावर उपाय म्हणून एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे.
काय काम केले जाते
- मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार
- भाडेकरार
- बक्षीसपत्र
- दस्तनोंदणी
- सर्च रिपोर्ट
सर्व्हरला तांत्रिक अडचणी आल्यास दस्त नोंदणीत अडथळे येतात, अनेकदा धीम्यागतीने कामकाज चालते, अशा तक्रारी येतात. यावर उपाययोजना म्हणून एका अधिकाऱ्याची नेमणूक ‘एनआयसी’मध्ये केली आहे. त्यामुळे सर्व्हरला आलेली समस्या तांत्रिक आहे किंवा विभागाच्या संगणकप्रणालीत आहे, हे लगेच समजू शकणार आहे. तसेच तातडीने अडचण दूर होऊन दस्त नोंदणी पूर्ववत होऊ शकेल.
- हिरालाल सोनवणे, नोंदणी महानिरीक्षक