पुणे (Pune) : महापालिकेत प्रवेश करताना केवळ सुरक्षारक्षकांनी अडवू नये, यासाठी महापालिकेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून बोगस ओळखपत्र वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्तापर्यंत ३००हून अधिक बोगस ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून संबंधित कर्मचारी, ठेकेदारांना सक्त ताकीद देण्याव्यतिरिक्त कारवाई झालेली नाही.
सरकारी, निमसरकारी संस्थांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, हा सर्व प्रकार गंभीर असूनही महापालिकेकडून त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची सद्यःस्थिती आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांकडून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दररोज होणाऱ्या चौकशीतून उघड झाला आहे.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विविध विभागांचे सुमारे १० हजार कर्मचारी काम करतात. याबरोबरच डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिकाऊ कामगार व अन्य कामे करण्यासाठी ठेकेदारांकडून कर्मचारी पुरविले जातात. महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेचा लोगो असणारे अधिकृत ओळखपत्र आहे, तर ठेकेदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीचे व ‘महापालिकेच्या सेवेसाठी’ असे ओळखपत्र देणे आवश्यक असते.
असे असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडून दररोज महापालिकेत ये-जा करताना बोगस ओळखपत्र गळ्यात घातले जात होते. हा प्रकार महापालिकेच्या सुरक्षा विभागात नव्याने नियुक्ती झालेल्या तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आला.
सुरक्षा रक्षकांकडून मागील दीड ते दोन महिन्यांपासून ओळखपत्र तपासणी व चौकशी करण्यास प्राधान्य देण्यात येऊ लागले आहे. या प्रकाराची महापालिकेच्या सुरक्षा विभागाने दखल घेऊन बोगस ओळखपत्र बाळगणाऱ्यांसह त्यांच्या ठेकेदारांना सक्त ताकीद दिली आहे. ठेकेदारांना त्यांचे अधिकृत ओळखपत्र कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच ओळखपत्र नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत प्रवेश करण्यासाठी दैनंदिन पास घेण्यास सांगण्यात आले आहे.
अद्याप गैरप्रकाराची नोंद नाही
बोगस ओळखपत्राचा प्रकार महापालिका प्रशासनाने अद्याप गांभीर्याने घेतलेला नाही. महापालिकेच्या विविध विभागांत महत्त्वपूर्ण व संवेदनशील कागदपत्रे, डेटा तसेच अर्थकारणाची मोठ्या प्रमाणात सुक्ष्म माहिती असते. ही संवेदनशील माहिती चोरून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्याप तरी अशा गैरप्रकाराची नोंद झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी आणखी कडक कारवाई होण्याची गरज आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून बोगस ओळखपत्र बाळगण्याच्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कर्मचारी, त्यांच्या ठेकेदारांना ताकीद दिली आहे, तसेच यापुढे ठेकेदाराने त्यांचे ओळखपत्र देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
- गणेश विटकर, सुरक्षा अधिकारी, महापालिका