पुणे (Pune) : पुणे विमानतळावर (Pune Airport) अडीच एकर जागेवर कार्गो टर्मिनल उभारून दोन महिने उलटले. मात्र, अद्याप ‘बीसीएएस’ची (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) मंजुरी मिळालेली नाही. कार्गोसेवा सुरू करण्यासाठी ‘बीसीएएस’ची परवानगी अनिवार्य असून, ती जूनमध्ये मिळणे अपेक्षित होते. परिणामी, आता पुण्यातील व्यापारी व उद्योजकांना आपला माल मुंबईहून देशांतर्गत व परदेशात पाठवावा लागत आहे.
कार्गोसेवेच्या विस्तारासाठी गेल्यावर्षी संरक्षण मंत्रालयाने पुणे विमानतळ प्राधिकरणाला दोन एकर जागा वार्षिक एक रुपयाच्या भाडेतत्त्वावर देण्यास मंजुरी दिली. यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने ही जागा एक वर्षासाठी एक कोटी ३० लाख रुपये भाड्याने देण्याचे मान्य केले होते. हे भाडे जास्त होते.
दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी प्रयत्न करून अवघ्या एक रुपयात विमानतळाला पाच वर्षांसाठी ही जागा मिळवून दिली. ती जागा व पूर्वीची अर्धा एकर असे मिळून एकूण अडीच एकर जागेवर आता कार्गो टर्मिनल उभे राहिले. मात्र, ते अजूनही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
प्रवाशांना होणार फायदा...
पुणे विमानतळावर प्रवासी व कार्गोसेवेला चांगला प्रतिसाद मिळतो. परंतु, कार्गोसेवेच्या विस्तारासाठी आवश्यक ती जागा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. पूर्वी कार्गोचे काम विमानतळावरील एक व दोन क्रमांकाच्या टर्मिनलमधून चालायचे. त्यामुळे दोन्ही टर्मिनलची इमारत एकमेकांना जोडता येत नव्हती.
आता कार्गो टर्मिनल नव्या जागेत उभारले आहे. त्यामुळे क्रमांक एक व दोनचे टर्मिनल एकमेकांना जोडता येईल. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. शिवाय, एकाच ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल. विमानतळ प्रशासनाने दोन्ही टर्मिनल जोडण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
‘बीसीएएस’कडून पाहणी
‘बीसीएएस’च्या पथकाने गुरुवारी पुणे विमानतळाची पाहणी केली. त्यांनी कार्गो टर्मिनललादेखील भेट दिली. कार्गोसेवेसाठी त्यांची ही दुसरी भेट होती. त्यांनी फेब्रुवारी महिन्यातही पाहणी करून आवश्यक त्या सूचना विमानतळ प्रशासनाला दिल्या होत्या. गुरुवारी केलेल्या पाहणीतही आवश्यक सूचना दिल्याचे समजते. त्याची पूर्तता करण्यास आणखी काही दिवस विलंब लागण्याची शक्यता आहे.
नव्या जागेत कार्गो टर्मिनल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. कार्गोसेवा सुरू करण्यासाठी ‘बीसीएएस’कडे परवानगी मागितली आहे. ‘बीसीएएस’च्या पथकाने गुरुवारी विमानतळाची पाहणी केली. मात्र, त्यांच्याकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ
पुणे हा पश्चिम महाराष्ट्राचा हब आहे. कार्गोसेवा बंद राहणे ही गंभीर बाब आहे. ही सेवा बंद असल्याने छोट्या-मोठ्या उद्योजकांना मुंबईहून आपला माल पाठवावा लागतो. कार्गोसेवा देणे ही विमानतळ प्रशासनाची जबाबदारी आहे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ