पुणे (Pune) : रस्ते खोदताना पथ विभाग आणि पाणी पुरवठा विभागात समन्वय असावा असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. पण त्यानंतरही प्रशासनाच्या कामात सुधारणा झालेली नाही. हंडेवाडी येथे महात्मा फुले चौकातील रस्त्याचे १५ दिवसांपूर्वी डांबरीकरण केले होते. पण समान पाणी पुरवठा योजनेसाठी पूर्व कल्पना न देता मंगळवारी (ता. २९) हा रस्ता खोदला आल्याचे प्रकार समोर आला आहे.
शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेने सुमारे १०० किलोमीटरचे रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या सहा टेंडर काढल्या आहेत. यातील चार क्रमांकाच्या टेंडरमधून हंडेवाडी येथील रस्त्यावर १५ दिवसांपूर्वीच डांबरीकरण केले होते.
त्यानंतर समान पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी महात्मा फुले चौकात जेसीबीने रस्ता खोदण्यात आला. हे काम करताना संबंधित ठेकेदाराने पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना दिलेली नव्हती. तसेच पाणी पुरवठा विभागाचे अधिकारीही अंधारातच असल्याचे समोर आले आहे.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी गेल्याच महिन्यात पथ विभाग, पाणी पुरवठा, विद्युत, मलःनिसारण विभागासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामे करावीत.
प्रत्येक महिन्याला अत्यावश्यक कामाचा आराखडा तयार करा, असे आदेश विभाग प्रमुखांना दिले होते. मात्र, प्रत्यक्षात या विभागांचा एकमेकांशी समन्वय नसल्याने ठेकेदाराने परस्पर खोदकाम केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पॅकेज चारमध्ये हंडेवाडी येथे १५ दिवसांपूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. समान पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी कोणतीही पूर्व कल्पना न देता हा रस्ता खोदण्यात आला आहे.
- व्ही. जी. कुलकर्णी, प्रमुख, पथ विभाग
या कामासाठी ठेकेदाराने पूर्वी परवानगी घेतली होती, पण रस्ता डांबरीकरण केल्यानंतर परवानगी घेतली नाही आणि आम्हालाही त्याबाबत कळविले नाही. त्यामुळे ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
- नंदकिशोर जगताप, अधिक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग