पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या (Sinhgad Road Flyover) कामाची गुणवत्ता तपासणी केली असता हिंगणे येथील एका खांबाच्या सिमेंटचा दर्जा कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने (PMC) हा खांब सुमारे दीड मीटर फोडून नव्याने काम करण्याचा आदेश संबंधित ठेकेदाराला (Contractor) दिला आहे.
राजाराम पूल ते फनटाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारला जात असून, हे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. यात ज्या भागात खाबांचे काम पूर्ण झाले आहे तेथे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. संतोष हॉल चौक ते राजाराम पूल या दरम्यान गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
कामाच्या गुणवत्तेची तपासणी त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आली. त्यामध्ये संतोष हॉल चौक ते विठ्ठलवाडी दरम्यानच्या दहा खांबांची तपासणी झाली. हिंगणे येथील एका खांबाच्या सिमेंटची गुणवत्ता ‘एम ३५‘ असणे आवश्यक असताना ती ‘एम ३०‘ इतकी असल्याचे आढळून आले. त्याबाबतचा अहवाल प्रकल्प विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर तेथील काम बंद करण्यात आले. हा खांब झाकण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील इतर कामेही खोळंबली आहेत.
प्रकल्प विभागाकडून ही चूक ठेकेदाराच्या लक्षात आणून देण्यात आली. नवे काम पूर्ण झाल्यानंतरच पुढील काम सुरवात होईल. या उड्डाणपुलाचे काम करताना माणिकबाग येथे केबल तुटल्याने तेथील काम पुन्हा करण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती. त्यानंतर आता खांबातील सिमेंटची गुणवत्ता कमी असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.