पुणे (Pune) : पुणे विमानतळाच्या (Pune Airport) नवीन टर्मिनलवर उतरून कॅबने बाहरे जाणाऱ्या प्रवाशांची आता सोय होणार आहे. विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलहून एरोमॉल येथे जाण्यासाठी १० गोल्फ कार्टसह लो फ्लोअर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कॅबच्या प्रवाशांना एरोमॉल येथे जाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही.
‘नवीन टर्मिनलवर होणार प्रवाशांची पायपीट’ या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. विमानतळ प्रशासनाने त्याची दखल घेत प्रवाशांना या सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन टर्मिनलचे फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उद्घाटन होणार आहे. जागेच्या अभावामुळे विमानतळ प्रशासनाने पिवळ्या नंबरप्लेट असलेल्या वाहनांना म्हणजेच कॅबला (टॅक्सी) ‘प्रवासी पिकअप’साठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे टॅक्सीने घर गाठणाऱ्या प्रवाशांना ‘पिकअप’साठी तिथून ५७० मीटर अंतरावर असलेल्या एरोमॉलला पायी जावे लागणार होते. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने कॅबच्या प्रवाशांसाठी मोफत गोल्फ कार्ट व बसची सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना ‘कॅब’साठी एरोमॉलपर्यंत जाणे सोपे होईल.
खासगी वाहनावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे खासगी वाहनातील प्रवाशांना ‘ड्रॉप अँड गो’ आणि ‘पीकअप’ची सुविधा असणार आहे. मात्र टॅक्सीला ‘पिकअप’ची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कॅब प्रवाशांचा प्रश्न निर्माण झाला होता. तो अखेर मार्गी लागला आहे.
‘एरोमॉल’साठी दोन पर्याय
- जुन्या टर्मिनलमधून एरोमॉलला जाण्यासाठी पादचारी पूल बांधला आहे. या पुलावर जाण्यासाठी सरकता जिना व लिफ्टची सोय केली आहे
- पादचारी पुलावर प्रवाशांना सामान घेऊन चालावे लागू नये म्हणून ट्रॅव्हलेटरची देखील सोय केलेली आहे
- नवीन टर्मिनल प्रवाशांसाठी खुले झाल्यावर प्रवाशांना जुन्या टर्मिनलच्या आवारातील या पादचारी पुलाचा वापर करून एरोमॉल येथे जाता येईल
- यासाठी गोल्फ कार्ट व लो फ्लोअर बसची सोय असणार आहे
- तर दुसरा पर्याय हा टर्मिनलच्या बाहेरच्या मुख्य रस्त्यावरून देखील प्रवाशांना या साधनांचा वापर करून एरोमॉल येथे जाता येणार आहे
हवाई दलाची भिंत पाडणार
नवीन टर्मिनलच्या बाहेर वाहनांची गर्दी होऊ नये म्हणून विमानतळ प्रशासनाने वायू दलाची अर्धा एकरची जमीन ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी हवाई दलाची संरक्षक भिंत बांधली होती. विमानतळ प्रशासन लवकरच ही भिंत पाडणार आहे. त्यामुळे विमान नगरकडे जाणारा रस्त्याचा मार्ग मोकळा होत आहे. महापालिकेने या रस्त्याचे काम केले आहे. मात्र भिंतीमुळे रस्त्याचे काम अडले होते. लवकरच ही भिंत पाडून त्या ठिकाणी रस्ता केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विमाननगरला जाण्यासाठी वळसा घालून जाण्याची गरज नाही. परिणामी विमानतळ परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही.
पिकअपसाठी टॅक्सीला परवानगी दिली नसली तरीही प्रवाशांच्या सोयीसाठी बस व गोल्फ कार्टची सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना चालत जावे लागणार नाही. सध्या तीन गोल्फ कार्ट असून ती संख्या वाढवून १० होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात दोन बस प्रवाशांच्या सेवेत धावतील. या सुविधा मोफत असणार आहेत.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे विमानतळ