पुणे (Pune) : पुणे शहरात पिंपरीपासून दापोडीपर्यंतचा मेट्रो मार्ग एलिव्हेटेड (उन्नत) आहे. त्याखालील भागात वेगवेगळ्या रंगसंगतीचे विद्युत दिवे महापालिका लावणार आहे. त्यासाठी सुमारे एक हजार खांब उभारून सुशोभित दिवे लावणार आहेत. त्यासाठी तब्बल सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
मेट्रोचा पिंपरी (एम्पायर इस्टेट सोसायटीपासून) ते दापोडी (मुळा नदीवरील हॅरिस पुलापर्यंत) मार्ग ३२२ खांबांवर साकारला आहे. या मार्गिकेखाली विद्युत दिव्यांचे खांब बसवून शोभिकरणाचा निर्णय महापालिका विद्युत विभागाने घेतला आहे. त्यासाठी सात कोटी ९४ लाख २८ हजार ४६८ रुपये खर्चाचे टेंडर काढले होते. त्यात पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यातील लेक्सा लायटिंग टेक्नॉलॉजीची कमी दराचे टेंडर पात्र ठरले आहे. त्यानुसार पाच कोटी ९५ लाख ५५ हजार ४६५ रुपये खर्च विद्युत दिव्यांसाठी (रोषणाई) होणार आहे. त्यास महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती सभेत यापूर्वीच मान्यता दिली आहे. शिवाय, आगामी २०२४-२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.
असे आहे नियोजन
दापोडी ते पिंपरी मेट्रो मार्ग उन्नत आहे. पिंपरीपासून निगडीपर्यंतचा नियोजित मेट्रो मार्गही उन्नत असेल. मात्र, मार्गाखालील रस्ता महापालिकेकडे आहे. त्यावरील अर्थात मेट्रो मार्गिकेखालील जागेचे सुशोभीकरण महापालिका करणार आहे. मेट्रोच्या दोन खांबांमध्ये डीएमएस प्रकारातील सुशोभित दिवे लावले जाणार आहेत. त्यामुळे विशिष्ट दिवसानुसार वेगवेगळी प्रकाश व्यवस्था करता येणार आहे.
स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी तिरंगा रंगाची प्रकाश व्यवस्था करता येईल. त्यामुळे हा मार्ग अधिक आकर्षक दिसणार आहे. त्यासाठी महामेट्रोची परवानगी घेण्यात आली आहे. संबंधित एजन्सी पाच वर्ष दिव्यांची देखभाल करणार आहे. दिव्यांचे खांब बसविण्याच्या कामाची मुदत चार महिने असेल.
दृष्टिक्षेपात....
- पिंपरी-दापोडी मेट्रो मार्गाखालील भाग विद्युत दिव्यांनी सुशोभित करणे
- पिंपरी-दापोडी अंतर सुमारे सात किलोमीटर असून ३२२ मेट्रो खांब आहेत
- दोन मेट्रो खांबांमध्ये विद्युत खांब उभारून वेगवेगळ्या रंगसंगतीचे दिवे असतील
- विद्युत दिवे बसविण्याच्या कामाचा कालावधी चार महिन्यांचा असेल
- विद्युत दिवे बसवून सुशोभिकरणाचा अपेक्षित खर्च पाच कोटी ९५ लाखांवर
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकांच्या परिसरात वृक्षारोपण व शोभेची झाडे-झुडपे लावली जाणार आहेत. त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती केली आहे. झाडे लावण्याचे काम सुरू केले आहे.
- हेमंत सोनवणे, जनसंपर्क महाव्यवस्थापक, मेट्रो