पुणे (Pune) : वीज वाहिनी उभी करण्यास जमीन मालकांकडून येणाऱ्या अडचणी, टेंडरला मिळणारा अत्यल्प प्रतिसाद आदी कारणांमुळे ‘महापारेषण’कडून (Mahatransco) हाती घेतलेल्या कामांना विलंब झाला असला, तरी ती कामे आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत, असा दावा ‘महापारेषण’ने केला आहे. याशिवाय, ही कामे कधी मार्गी लागतील, याचे वेळापत्रकच त्यांनी शुक्रवारी जाहीर केले.
'पीएमआरडीए'च्या हद्दीचा गतीने विकास होत असताना, त्या तुलनेत 'महापारेषण'कडून पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली होती. त्यावर महापारेषणचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत सुरू असलेली प्रस्तावित आणि प्रगतिपथावर असलेल्या कामांची माहिती व ती कधी पूर्ण होतील, याचे सविस्तर वेळापत्रक सादर केले. ही कामे पूर्ण झाल्यावर या परिसरातील विजेचा प्रश्न मार्गी लागण्यास कशी मदत होईल, याची माहितीही त्यांनी दिली.
‘महापारेषण’ने म्हटले आहे, की यंत्रणेची देखभाल करताना मागील पाच महिन्यांत ३२४ पैकी केवळ दोन रोहित्र नादुरूस्त झाले. चाकण येथील हा नादुरूस्त रोहित्र नऊ दिवसांच्या वेळेत बदलला. यादरम्यान वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था केली होती. पावसाळ्यादरम्यान वाहिन्यांचे बिघाड हे दुर्गम भागात असूनसुद्धा कमी वेळेत ते पूर्ववत केले. पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये वाहिनीचे काम करताना महापारेषणला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. शेतकरी व जमीनमालकांचा रोष पत्करावा लागतो.
वाहिनी उभारणी करताना पूर्वीच्या आदेशानुसार नुकसान भरपाई ही तुटपुंजी होती. परंतु, नुकतीच त्यामध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे महापारेषण वाहिन्यांची रखडलेली कामे (४०० के. व्ही. जेजुरी ते हिंजवडी वाहिनी, २२० के. व्ही. चिंचवड ते उर्से, २२० के. व्ही. जेजुरी ते लोणंद) मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच कोरोना व जागतिक मंदीमुळे विद्युत उपकरणे व खनिज संपत्तीचे दर वाढले आहेत. त्यामुळे महापारेषणच्या टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. आता नवीन दरामुळे प्रस्तावित कामांच्या टेंडर्सला चांगला वेग मिळत आहे, असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे.