पुणे (Pune) : गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात (आचार्य आनंदऋषीजी चौक) दुमजली उड्डाणपुलाच्या (Flyover) कामास अखेर मुहूर्त मिळाला आहे. या चौकात उड्डाणपुलासाठी उभारलेल्या खांबांवर सोमवारी रात्रीपासून पिअर आर्म बसविण्याच्या कामास सुरूवात झाली आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान ‘पीएमआरडीए’ने मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आला. तेथे दुमजली उड्डाणपूल उभारणार आहे. हे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना ‘पुमटा’च्या बैठकीत दिल्या होत्या. मात्र, विद्यापीठ चौकातील सेवा वाहिन्या हलविण्याचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. तसेच, वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, म्हणून पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर बॅरेकेडिंग करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे हे काम रखडले होते.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मध्यंतरी ‘पुमटा’ची बैठक झाली. यात महापालिका आणि पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारात तातडीने बॅरेकेडिंगसाठी परवानगी देण्याचा आदेश त्यांनी दिला होता. परंतु, ‘जी- २०’ परिषदेमुळे हे काम पुन्हा लांबणीवर पडले होते. अखेर या कामाला मुहूर्त मिळाला आहे.
गणेशखिंड रस्त्यावर जेथे पूल सुरू होणार आहे, तसेच ई-स्केवर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतरणार आहे, त्या ठिकाणच्या पिलरचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. मुख्य चौकात उड्डाणपुलाचा खांब (पिलर) असल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यावर पर्याय म्हणून या चौकात एकही खांब न उभारता दोन पिलरमध्ये ५५ मीटरचे अंतर ठेवणार होते. त्या ठिकाणी लोखंडी गर्डरचा स्पॅन टाकण्याचा पर्याय पुढे आला.
मेट्रोच्या दोन पिलरमधील अंतर ३८ मीटर आहे. परंतु चौकात हे अंतर जवळपास दुप्पट ठेवले आहे. परिणामी, चौकात पिलर उभारण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे ५५ मीटर लांबीचा आणि १८ ते २० मीटर रुंदीचा हा स्पॅन असणार आहे.
दुमजली उड्डाणपुलासाठी ३२ पैकी २७ खांबांचे काम पूर्ण झाले आहे. विद्यापीठ चौकातील कामाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात केली आहे. गणेशखिंड रस्त्यावरील ई-स्केअरसमोरील खांबावर पहिला पिअर आर्म उभारला आहे.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए