पुणे (Pune) : जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे (Old Mumbai Pune Highway) रुंदीकरण करताना खडकी रेल्वे स्टेशन समोरील हॉटेल व चित्रपट गृहाची जागा ताब्यात घेताना नुकसान भरपाई जास्त मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील स्थगिती उठवली असून, त्यामुळे जागा ताब्यात घेता येणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणातील अडथळा दूर झाला आहे.
महापालिकेने जुन्या मुंबई पुणे महामार्गाचे रुंदीकरण हाती घेतले आहे. यामध्ये खडकी रेल्वे स्थानकासमोर जयहिंद चित्रपटगृह असून, ही जागा खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ९९ वर्षे भाडे कराराने दिली आहे. त्याच जागेत एक हॉटेल ही सुरू झाले आहे.
ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरू केली, त्यावेळी कॅन्टोन्मेंटने जागा ताब्यात घेण्यास मान्यात दिली. पण जागेचे मूल्यांकन करून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यास सांगितले.
महापालिकेने हे मूल्यांकन करून घेतले, असता ४३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निश्चित झाले. पण ही रक्कम अमान्य असल्याने हॉटेल चालकाने महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले मूल्यांकन योग्य ठरवत मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश देत भूसंपादनावरील स्थगिती उठविली.
महापालिकेतर्फे ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी बाजू मांडली, अशी माहिती मुख्य विधी सल्लागार निशा चव्हाण यांनी दिली. पथ विभागाचे प्रमख अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त महेश पाटील यावेळी न्यायालयात उपस्थित होते.