पुणे (Pune) : राज्याचे जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांची ‘यशदा’चे महासंचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रिक्त झालेल्या त्यांच्या पदावर सचिंद्र प्रताप सिंह (Sachindra Pratap Singh) यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.
जमाबंदी आयुक्तपदाच्या तीन वर्षांच्या कालावधीत सुधांशू यांनी भूमिअभिलेख विभागाकडून हाती घेण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांना गती देण्याचे काम केले. ई-मोजणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘ई-मोजणी व्हर्जन २’ त्यांनी आणले.
गावठाणामधील मिळकतींना मालकी हक्क देणारे प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या स्वामित्व योजनेस सुधांशू यांनी गती दिली. सातबारा उताऱ्यावर क्युआर कोड, स्वामित्व योजना तसेच ई-हक्क प्रणालीची अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळात सुरू झाली. सातबारा उताऱ्यावरील प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
मागील आठवड्यात राज्य सरकारकडून त्यांची ‘यशदा’चे महासंचालक पदावर बदली करण्यात आली होती. तर जमाबंदी आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला होता. अखेर सरकारकडून जमाबंदी आयुक्त पदावर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. सिंह हे ‘यशदा’ येथे अतिरिक्त महासंचालक या पदावर कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.