पुणे (Pune) : पुणे महापालिकेत (PMC) समाविष्ट झालेल्या लोहगाव (Lohegaon), वाघोली (Wagholi) गावाला नियमीत पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने २३२ कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. त्यास महापालिकेच्या अंदाज समितीने मान्यता दिली. त्यामुळे आता टेंडर (Tender) काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये पाणी पुरवठ्याची स्थिती चिंताजनक आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या भागात मर्यादित पाणी पुरवठा होत होता, पण आता या भागात अनेक मोठ्या इमारती झाल्याने लोकसंख्या वाढली आहे. पण त्यांना ग्रामपंचायतीच्या योजनेतून पाणी दिले जात नाही.
बहुतांश सोसायट्या टँकरवर अवलंबून आहेत. लोहगाव, वाघोलीतील लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे या भागात तर पाण्याची टंचाई तीव्र आहे.
प्रशासनाने यापूर्वी सूस म्हाळुंगे, बावधन या दोन पाणी पुरवठा योजनांना मंजुरी देऊन काम सुरू केले आहे. आता लोहगाव वाघोलीसाठी योजना तयार केली आहे. या दोन्ही गावाचे क्षेत्रफळ ५० चौरस किलोमीटर आहे. पुढील ३० वर्षांचा म्हणजे २०५२ पर्यंतचा विचार करून ११२ एमएलडी क्षमतेचा हा प्रकल्प होणार आहे. या भागाला भामा आसखेड धरणातून पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यासाठी १३ पाण्याच्या टाक्या, ४३२ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.
लोहगाव वाघोली गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा खर्च जीएसटीसह २३२ कोटी रुपये आहे, त्यास अंदाज समितीने मंगळवारी मान्यात दिली. त्यामुळे आता टेंडर प्रक्रिया राबवून त्यास स्थायी समितीची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा, पुणे महापालिका
लोहगाव-वाघोलीतील पाणी टंचाई सोडविण्यासाठी नियोजन करावे यासाठी महापालिकेपुढे उपोषण केले होते. प्रशासनाने तेव्हा लकरच या योजनेचा आराखडा तयार करू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी २३२ कोटीच्या खर्चाला मान्यता दिली आहे. लवकरच या भागातील पाणी प्रश्न मार्गी लागेल.
- सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी