पुणे (Pune) : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पुण्यातील कॅबसाठी जो दर ठरविला आहे. त्या दराची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असा आदेश पुणे आरटीओ (RTO) प्रशासनाने संबंधित कॅब कंपनीच्या प्रतिनिधींना दिला आहे.
नवीन दराची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांनी थोड्या दिवसांची मुदत मागितली आहे. दरम्यान, इंडियन गिग वर्कर्स फ्रंटने २० फेब्रुवारीपासून ‘आरटीओ’समोर निदर्शने करून कॅब सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्याच्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने एसी कॅबसाठी किमान दर ठरविला आहे. १ जानेवारी २०२४ पासून नवीन दराची अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील संबंधित कंपनीला दिले होते, मात्र पुण्यातील कोणत्याही कंपनीने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. दरम्यान २० फेब्रुवारीपासून पुण्यात कॅब चालकांचा संप घेण्यावर ठाम असल्याचे इंडियन गिग वर्कर्सचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
हे आहेत दर
दर ठरविताना मुंबईतील एसी टॅक्सीच्या दराचा आधार घेण्यात आलेला आहे. पुण्यात पहिल्यादांच कॅबसाठी दर ठरविण्यात आले आहेत. काळ्या-पिवळ्या टॅक्सीला पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३१ रुपये, त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी २१ रुपये तर वातानुकूलित टॅक्सीला (कुलकॅब) पहिल्या १.५ किलोमीटरसाठी ३७ रुपये व त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी २५ रुपये असा भाडेदर निश्चित करण्यात आला आहे.
‘आरटीओ’च्या माहितीनुसार पूर्वी असे दर नव्हते. मात्र प्रवाशांकडून कॅब चालक प्रतिकिलोमीटर १५ ते २० रुपये दर आकारत होते.
कॅबसाठी जो दर ठरविण्यात आला आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आहे. त्यांना दर लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी), पुणे