पुणे (Pune) : मोठमोठे सण, समारंभ आनंदोत्साहात साजरे झाले, राष्ट्रपतींपासून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे दौरेही झाले. धार्मिक नेत्यांचे भव्यदिव्य कार्यक्रम होऊन महिना उलटला, तरीही शहराच्या वेगवेगळ्या भागांत लावलेले अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर काही हटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्याद्वारे रस्त्यांवरील विजेचे खांब, झाडे, बसथांब्यांपासून ते अनेक सार्वजनिक ठिकाणांचे विद्रूपीकरण करण्याचा प्रकार सुरूच आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून मात्र अद्याप कारवाईला सुरवात झाली नसल्याची सद्यःस्थिती आहे.
शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी यांसारखे सण पुणेकरांनी आनंदोत्साहात साजरे केले. त्यानंतर शहरामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध राजकीय नेत्यांचे दौरे झाले. या कालावधीमध्ये राजकीय नेत्यांसह अनेकांनी आपापली जाहिरातबाजी करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करण्याची संधी सोडली नाही.
गणेशोत्सव व दिवाळीच्या कालावधीमध्ये अनधिकृत फ्लेक्सबाजीला तर अक्षरशः उधाण आले होते. दुभाजक व पदपथांवरील विजेचे खांब, बसथांबे, मोठमोठी झाडे, चौकांमधील फलक, रस्त्यांच्याकडेला असणाऱ्या इमारती अशा अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्सबाजी जोरात सुरू आहे.
मोठ्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी अनेकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून ‘चमकोगिरीपणा’ करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स लावण्याचे पेव पुन्हा एकदा फुटल्याचे चित्र आहे.
अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरविरुद्धची कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई वेगाने करून अनधिकृत फ्लेक्स, बॅनरबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
- माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका
कुठल्याही चौकात, रस्त्यावर थांबले तरीही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर दिसतात. त्यांच्यावर कारवाई केल्यास शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबेल. महापालिकेने अशा ‘चमकोगिरी’ करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.
- विजय पानसे, नागरिक