पुणे (Pune) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (SPPU) प्रश्नपत्रिकांसंबंधीचे १५ कोटींचे कंत्राट (Contract) कोणतीही टेंडर (Tender) प्रक्रिया न राबविता थेट एका कंपनीला देण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील शैक्षणिक करारांची चौकशी सुरू असतानाच, विभागाला दीड कोटी रुपये देण्यात आल्याचेही उघडकीस आले आहे. हे संपूर्ण प्रकार केवळ पैसे खाण्यासाठी केले असून, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अधिसभा सदस्य सचिन गोरडे पाटील यांनी केली आहे.
गोरडे पाटील यांनी यासंबंधीची पत्रकार परिषद घेतली. कर्मचाऱ्यांच्या विमा हप्त्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. पुणे विद्यापीठातील सुमारे ५०० अनुदानित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची वैद्यकीय शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू असतानाही, त्यांचा पुन्हा ‘थर्ड पार्टी’ विमा काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. विद्यापीठ कायद्यातील १५७ (क) नुसार कुलगुरूंना १२ लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्याचे अधिकार नाहीत. अशावेळी मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये मान्यता न घेता, केवळ विमा कंपनीच्या फायद्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुन्हा विमा काढण्यात आला. त्यासाठी सुमारे तीन कोटी ४३ लाख रुपये खर्च केल्याचे गोरडे पाटील यांनी सांगितले.
तपशील आल्यावर खुलासा
सचिन गोरडे पाटील हे विद्यापीठाच्या अधिकार मंडळात असून, यासंबंधीची तपशीलवार माहिती ते मिळवू शकतात. त्यांनी ऐन रविवारी पत्रकार परिषद घेत विद्यापीठावर आरोप केले आहेत. माध्यमांकडूनच आम्हाला आरोपासंबंधी कळत असून, यासंबंधीचा कोणताच तपशील आमच्याकडे नाही. गोरडे पाटील यांच्याकडील आरोपांचा अभ्यास करून, योग्य असल्यास खुलासा प्रसिद्ध करण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.