पुणे (Pune) : खासगी बस चालकांनो, दिवाळीच्या काळात नियमापेक्षा अधिक दर आकारून प्रवाशांची लूट केल्यास परमीटसह अन्य प्रकारची कारवाई करू, असा सज्जड दम पुणे आरटीओ (Pune RTO) प्रशासनाने दिला. खासगी बस चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरटीओ प्रशासनाने दोन भरारी पथके तयार केले असून शहराच्या विविध भागांत फिरून दोषी चालकांवर कारवाई करणार आहेत.
आरटीओ प्रशासनाने गुरुवारी पुणे कार्यालयात खासगी बसचालकांची बैठक घेतली. त्यात सुमारे ४० बसमालक सहभागी झाले होते. सर्वांनी नियमाप्रमाणे दराची आकारणी करू, अशी ग्वाही प्रशासनाला दिली.
दिवाळीच्या काळात एसटी, रेल्वे गाड्या फुल्ल असल्याचा फायदा खासगी बसचालकांकडून घेतला जातो. एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत ५० टक्के अथवा दीडपट दर आकारण्याची खासगी बसला मुभा आहे. मात्र प्रत्यक्षात एसटीच्या तिकिटाच्या तुलनेत दुप्पट दर आकाराला जातो.
दिवाळी संपल्यावर परतीच्या प्रवासात तर हा दर जवळपास तिप्पटच होतो. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले व अन्य अधिकारी उपस्थित होते.
खासगी बस दृष्टिक्षेपात
दैनंदिन वाहतूक : ९००
दिवाळीतील वाहतूक : १५००
सर्वाधिक बस : मराठवाडा व विदर्भात
परराज्यांत : बंगळूर व हैदराबाद
खासगी बसचालकांची बैठक घेऊन नियमानुसार दर आकारणीच्या सूचना दिल्या आहेत. जे चालक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. ते शुक्रवारपासून कारवाईला सुरुवात करतील.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे