पुणे (Pune) : बाणेर- बालेवाडी या भागात सध्या शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रोचे (Shivajinagar - Hinjawadi Metro Line) काम सुरू आहे. हे काम करत असताना गणराज चौक येथे रस्त्याच्या कडेला दुकानांसमोर एक मोठा खड्डा खोदण्यात आला आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून तो तसाच असल्याने या भागातील व्यावसायिकांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होत आहे, तरी हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी या भागातील व्यावसायिक करीत आहेत.
व्यावसायिक माणिक एरंडे म्हणाले की, या खड्ड्यामुळे नागरिकांना दुकानात येताना अडचण निर्माण होत आहे. ग्राहक दुकानात येत नसल्यामुळे साहजिकच त्याचा व्यवसायावर परिणाम होत असून, आर्थिक घडी विस्कळित होत आहे.
बाणेर येथील रहिवासी किरण सायकर यांनी सांगितले की, गेल्या दीड महिन्यांपासून हा खड्डा खणून ठेवला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठले आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर येऊ शकतो,
तसेच व्यवसायावरही याचा परिणाम होत असल्याने तरी या भागातील काम तातडीने करून घ्यावे.
गणराज चौकात गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या आठवड्यात त्यावर वॉल्व्ह बसविला जाणार आहे, तसेच इतरही तांत्रिक अडचणी असून, त्याचे निराकरण करावे लागत असल्याने कामाला वेळ लागतो आहे. तरी हे काम त्वरित करण्याचा प्रयत्न करत आहोत.
- उमेश मल्लावत, कार्यकारी अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण