पुणे (Pune) : वारजे येथे महामार्गालगत असणाऱ्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर अनधिकृत पार्किंग करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना येथे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महापालिकेचे आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
वारजे उड्डाणपूल ते सिंहगड महाविद्यालय आणि पुन्हा शोभापुरम सोसायटी ते चर्च अशा दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर सर्रास दुचाकीसह चारचाकी मोटार रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावल्या जातात. अनेक नागरिक नोकरीला जाताना येथे वाहने लावतात आणि कंपनीच्या वाहनाने उचित ठिकाणी जातात. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत येथे वाहने पार्क केलेली असतात.
येथील स्वर्णा हॉटेल, माई मंगेशकर रुग्णालय, सिंहगड महाविद्यालयाजवळ सेवा रस्त्यावर बेकायदा वाहनतळ झाले आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरही नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. एकाच ठिकाणी सुमारे ८० ते १०० वाहने ओळीने लागताना असतात. अशा वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवासी विजय खिलारे यांनी केली आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून सेवा रस्ते बनविले आहेत. मात्र या सेवा रस्त्याचा वापर नागरिकांची वाहने लावण्यासाठी होत आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्याचा वापर करताना अडचण निर्माण होत आहे.
- गौतम शिंदे, स्थानिक रहिवासी
सेवा रस्ता मार्गावरील काही जमीन महापालिकेच्या ताब्यात नसल्याने येथील रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. पूर्ण झालेल्या रस्त्यावर वाहने लावण्यात येत आहेत. त्यावर वाहतूक विभागाने कारवाई करावी.
- राजेश गुर्रम, सहाय्यक आयुक्त, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय