पुणे (Pune) : कर्वेनगरमधील अदांजे दहा ते बारा वर्षांपूर्वी नव्याने बांधलेल्या स्व. नानासाहेब बराटे उड्डाणपुलावर राडारोडा, वाळू, खडी आणि छोटे-मोठे दगडी विटांचे तुकडे इत्यादी बांधकाम साहित्य पडले असल्याने या पुलावरील रस्ता खडबडीत, अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे.
कर्वेनगरकडून वारजे, उत्तमनगर, शिवणे परिसरात किंवा उत्तमनगर, शिवणे, वारजेकडून शहरी भागात जाण्यासाठी कोंडी होत होती. पुलाची उभारणी केल्यानंतर सोईस्कर वाहतूक म्हणून हा पूल नागरिकांना उपयुक्त ठरत आहे. यामुळे वाहतूककोंडीमध्ये नागरिक अडकत तर नाहीच, शिवाय इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी वेळही कमी लागत आहे. पण, या उड्डाणपुलावर महापालिका आरोग्य विभागाकडून नियमित स्वच्छता होत नसल्याने खडी, वाळू यामुळे वाहनचालक घसरून अपघात होत आहे.
सकाळी आणि सायंकाळी ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनचालक गडबडीत असतानाच अपघात होतात. त्यामुळे दुखापत, वेळ आणि अपघात खर्च, वाहनांचे नुकसान असा दुहेरी मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील रस्ता तातडीने स्वच्छ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
अवजड वाहनातून बांधकाम साहित्याचे वाहतूक नियमित होत असल्याने रस्तावर वाळू, खडी, छोटे दगड असल्याने अपघात नियमित होत आहे. नियमित सफाई झाली ,तर अपघात नक्कीच कमी होतील.
- संगीता बराटे, स्थानिक रहिवासी
पुलावरील झाडण्याचे काम, स्वच्छता नियमित होत असते. बांधकाम साहित्याची वाहतूक होत असताना हादरा बसत असल्याने वाळू, खडी पुलावर पडत आहे. संबंधित पुलावर तातडीने पाहणी करून स्वच्छता करण्यात येईल.
- गणेश खिरीड, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय