पुणे (Pune) : पुणे-सातारा रस्त्याच्या (Pune-Satara Road) रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या पहिल्या मुदतीला शुक्रवारी (ता. ३१) १० वर्षे पूर्ण झाले. तर पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होऊन तेरा वर्षांचा कालावधी उलटला आहे. या तेरा वर्षानंतर अजूनही या रस्त्याचे काम किती पूर्ण झाले आणि किती अपूर्ण राहिले याबाबत सावळा गोंधळ आहे. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम नक्की कधी पूर्ण होणार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
विशेष म्हणजे या १० वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यासाठी रिलायन्स इन्फ्राला अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली. अनेकदा तारीख पे तारीख देऊनही रिलायन्स इन्फ्राला हे काम पूर्ण करता आले नाही. त्यासाठी मध्यंतरीच्या काळात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खेड शिवापूर टोलनाका स्वतःकडे सहा महिन्यांसाठी हस्तांतरित केला. या काळात जमा झालेल्या रकमेतून स्वतः दुसऱ्या ठेकेदारांच्या माध्यमातून या रस्त्यावरील अनेक अपूर्ण कामे पूर्ण केली. मात्र, त्यांनतर परिस्थितीत सुधारणा झालेली नसून या रस्त्याच्या रुंदीकरणाची अजून कामे बाकी आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्याशी संपर्क साधला मात्र, त्यांनी याबाबत दूरध्वनीवर बोलण्यास नकार दिला. कार्यालयात भेटण्यासही ते उपलब्ध झाले नाहीत.
अशी आहे स्थिती
- सुमारे १३ वर्षांपूर्वी देहूरोड ते सातारा या १४० किलोमीटरच्या टप्प्यातील रुंदीकरण सुरू
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रुंदीकरण कामाचा ठेका रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला दिला
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्यातील करारानुसार काम ३१ मार्च २०१३ला पूर्ण होणे अपेक्षित होते.
- काम पूर्ण होण्याच्या पहिल्या मुदतीला ३१ मार्चला १० वर्षे पूर्ण.
- प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन १३ वर्षे उलटली.
नक्की कधी पूर्ण होणार काम?
शिवरे, वरवे या भागात अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान अनेक ठिकाणी ड्रेनेज लाइनची कामे झालेली नाहीत. खेड शिवापूर, शिवरे आणि हरिश्चंद्री येथील प्रस्तावित उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या कामाला अजून सुरुवातही झालेली नाही. त्याचबरोबर रस्त्यावरील पथदिवे आदी अनेक किरकोळ कामे बाकी आहेत. या परिस्थितीत पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम नक्की कधी पूर्ण होणार? असा सवाल प्रवासी आणि स्थानिक नागरिक विचारत आहेत.