Pune News पुणे : नोंदणी न करताच ग्राहकांना वाहनांची विक्री केल्याप्रकरणी पुणे आरटीओ (Pune RTO) प्रशासनाने पुण्यातील सहा वाहन विक्रेत्यांचे ‘ट्रेड सर्टिफिकेट’ (वाहन विक्री परवाना) १० दिवसांसाठी रद्द केला आहे. या दहा दिवसांत वाहन विक्रेत्यांना वाहनांची विक्री करता येणार नाही. पुणे आरटीओ प्रशासनाने पहिल्यादांच वाहन विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे बोलले जात आहे.
कल्याणीनगर रस्ते अपघातानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन तपासणी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत पुण्याच्या वायुवेग पथकाला विनानोंदणीच्या ११ दुचाकी रस्त्यावर फिरताना आढळून आल्या होत्या. तेव्हा संबंधित विक्रेत्यांना नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत खुलासा करण्याची मुदत दिली होती.
खुलासा कोणताही आला तरी मोटार वाहन कायद्यानुसार ही गंभीर बाब असल्याने पुणे आरटीओ त्या सहा विक्रेत्यांवर कारवाई करणार, हे निश्चित मानले जात होते. पुणे शहरातील सहा व इतर जिल्ह्यांतील पाच अशा एकूण ११ दुचाकींवर कारवाई करण्यात आली होती. अन्य जिल्ह्यांतील वाहन विक्रेत्यांवरही कारवाई करावी, असे पुणे आरटीओ प्रशासनाने संबंधित आरटीओ प्रशासनाला कळविले होते.
या सहा विक्रेत्यांवर झाली कारवाई
- टीव्हीएस शेलार, खराडी
- आर्यन टू व्हीलर्स
- सातव ऑटोमोबाइल्स, हडपसर
- कोठारी व्हील्स, कोंढवा
- पीआर ऑटोमोटिव्ह, मांजरी
- साईदीप व्हील्स
पुण्यातील सहा वाहन विक्रेत्यांवर ‘ट्रेड सर्टिफिकेट’ रद्दची कारवाई करण्यात आली आहे. १० दिवसांकरिता ट्रेड सर्टिफिकेट रद्द करण्यात आले आहे. मोटार वाहन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे