पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) हाती घेतलेल्या रिंग रोड (Ring Road) प्रकल्पासाठी पश्चिम भागातील १४ गावांतील सुमारे साठ टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे रिंगरोडचा हा भाग विकसित करण्यासाठी रस्ते महामंडळाने टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. डिसेंबर अखेर टेंडर मागवून पुढील वर्षी काम हाती घेण्यात येईल.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाने १७२ किलोमीटर लांब आणि ११० मीटर रुंदीच्या रिंगरोडचा प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत रिंगरोडचे काम करण्यात येईल. पूर्व भागात मावळमधील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून रिंगरोड जाणार आहे.
पश्चिम भागात भोरमधील पाच, हवेलीतील ११, मुळशीतील १५ आणि मावळातील सहा गावांतून हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ४४ गावांतील सुमारे साडेसातशे हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.
पश्चिम भागातील भूसंपादनाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने पाच जुलैपासून सुरू केली. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना नोटिसा देऊन संमतिपत्र सादर करण्यासाठी ३० जुलै पर्यंत मुदत देण्यात आली, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा तसेच अन्य कारणांमुळे ही मुदत २१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. त्यानुसार या भागातील जागेचे जवळपास साठ टक्के भूसंपादन पूर्ण झाले.
नियमानुसार ऐंशी टक्के भूसंपादन झाल्यानंतर टेंडर काढता येतात. येत्या महिन्यात शंभर टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एकीकडे भूसंपादनाला गती देण्याबरोबरच दुसरीकडे पश्चिम भागातील रिंगरोड विकसित करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली. त्यासाठी टेंडर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पुढील महिन्यात टेंडर मागविण्यात येतील, असे रस्ते महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या गावांत भूसंपादन
पश्चिम भाग ः भोर, हवेली, मुळशी, मावळ या चार तालुक्यांतून जाणार, कल्याण, खामगाव मावळ, भगतवाडी, रहाटवडे, वडदरे, सांगरूण, बहुली, मोरदरवाडी, थोपटेवाडी, मांडवी बुद्रूक या गावांचा समावेश
- एकूण लांबी ः ६२ किलोमीटर
- रुंदी ः ११० मीटर
- जमिनीचे भूसंपादन (पश्चिम भाग ) ः ६९५ हेक्टऱ
- भूसंपादनासाठी अंदाजे खर्च ः ५००० कोटी रुपये
- रस्ता बांधणीसाठी अंदाजे खर्च ः ७००० हजार कोटी रुपये