पुणे (Pune) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) प्रस्तावित रिंगरोडच्या (Ring Road) भूसंपादनाला जुलैपासून सुरूवात होणार आहे. रिंगरोडच्या पश्चिम मार्गाचे फेरमूल्यांकन पूर्ण झाले असून जागा मालकांना द्यावयाचा मोबदला आणि जमीन ताब्यात घेण्याबाबतच्या नोटीस जूनअखेरपासून पाठविण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किमी आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. संपूर्ण प्रकल्पासाठी २६ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
प्रकल्पासाठी मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, हे मूल्यांकन गेल्या तीन वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार गृहित धरून करण्यात आले. कोरोना काळात बहुतांशी गावांत खरेदी-विक्रीचे व्यवहार अत्यल्प झाले.
परिणामी, प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या जमिनींचा दर कमी होत असल्याचा आक्षेप स्थानिकांनी घेतला. त्यामुळे गेल्या पाच वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पश्चिम भागातील बहुतांशी सर्व गावांचे फेरमूल्यांकन पूर्ण करण्यात आले असून पूर्व भागातील काही गावांचे फेरमूल्यांकन अद्याप बाकी आहे.
‘वर्तुळाकार रस्त्याच्या पश्चिम मार्गाचे फेरमूल्यांकनाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे, तर पूर्व भागाचे काम अंतिम टप्प्यात आहे. फेरमूल्यांकनानुसार प्रकल्पग्रस्तांना द्यायच्या मोबदल्याचे तक्ते अद्ययावत करावे लागणार आहेत.
त्यानंतर पुन्हा मान्यता घेऊन जूनअखेरपासून प्रकल्पग्रस्तांची किती जमीन संपादित केली जाणार आहे, त्याचा मोबदला किती मिळेल, याबाबतची नोटीस पाठविण्यात येईल. त्यानंतर तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल. स्वत:हून जमीन देणाऱ्यांना अतिरिक्त मोबदला दिला जाणार आहे’, अशी माहिती भूसंपादन समन्वय अधिकारी प्रविण साळुंखे यांनी दिली.
पूर्व मार्ग
- मावळातील ११, खेडमधील १२, हवेलीतील १५, पुरंदरमधील ५, भोरमधील ३ गावांतून प्रस्तावित
पश्चिम मार्ग
- भोरमधील ५, हवेलीतील ११, मुळशीतील १५, मावळमधील ८ गावांतून जाणार