पुणे (Pune) : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या रिंगरोड (Pune Ring Road) प्रकल्पात मेट्रोसाठी (Pune Metro) पाच मीटरची राखीव लेन, दहा बोगदे, सतरा उड्डाणपूल, रेल्वेचे तीन उड्डाणपूल प्रारूप अहवालात प्रस्तावित करण्यात आले आहेत. रिंगरोडची रुंदी ६५ मीटर रुंद आणि अंतर ८३.१२ किलोमीटर असेल.
प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय पीएमआरडीएने यापूर्वीच घेतला आहे. आधी एकूण अंतर १२३.९७ किमी, तर रुंदी ९० मीटर इतकी होती. मध्यंतरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडप्रमाणेच रुंदी ११० मीटर करण्याचा निर्णय झाला होता. परंतु या दोन्ही रिंगरोडमध्ये केवळ सुमारे १५ किलोमीटरचे अंतर आहे.
काही गावांमध्ये ते ओव्हरलॅप होतात. अशा गावांमधील एमएसआरडीसीच्या रिंगरोडचा सुमारे ३८.३४ किलोमीटरचा भाग वगळण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता. मध्यंतरी तो पुन्हा एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे पीएमआरडीएच्या रिंगरोडचे अंतर ८३.१२ किलोमीटर करण्याचा निर्णय झाला.
रिंगरोड १९८७ च्या प्रादेशिक आराखड्यातील आहे. दरम्यानच्या कालावधीत या रस्त्यावर अनेक ठिकाणी बांधकामांना परवानग्या देण्यात आल्या. त्यामुळे भूसंपादनात अनेक अडचणी येणार असून खर्चही वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रकल्पालाच मोठा विरोध होत आहे.
रिंगरोडसाठी निधी उपलब्ध करून देण्यास सरकार तयार नाही. तसेच रिंगरोडपासून १५ किलोमीटर अंतरावरूनच एमएसआरडीसीचा सुमारे ११० अंतराचा रिंगरोड जाणार आहे. त्यामुळे एवढ्या कमी अंतरावरून जाणारे दोन्ही रिंगरोड एकाच रुंदीचे करणे योग्य होणार नाही असे मत पडले. त्यानंतर रिंगरोडची रुंदी ११० वरून ६५ मीटर करण्याचा निर्णय झाला. त्यास राज्य सरकारनेही मान्यता दिली. त्यानुसार नव्याने सर्वंकष अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम टेंडर काढून सल्लागार कंपनीला देण्यात आले होते.
या कंपनीने रिंगरोडचा प्रारूप अहवाल सादर केला. पीएमआरडीकडून हद्दीचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तो अंतिम मान्यतेच्या टप्प्यात आहे. त्यामध्ये रिंगरोडचा समावेश करण्यात आला आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- एकूण अंतर ः ८३.१२ किमी
- रुंदी ः ६५ मीटर
- मेट्रोसाठी पाच मीटर लेन राखीव
- पुणे-सातारा ते नगर रोड जोडणार
- रिंग रोडला जोडणाऱ्या ४२ रस्त्यांचाही विकास होणार
- टीपी स्किमच्या माध्यमातून भूसंपादन करण्याचे नियोजन
- हवेली, खेड, मावळ आणि मुळशी या तालुक्यांतून मार्ग जाणार
- एकूण ९.१३ किलोमीटर अंतराचे दहा बोगदे
- १७ मोठे उड्डाणपूल
पीएमआरडीएने हाती घेतलेल्या रिंगरोडचा प्रारूप अहवाल सल्लागार कंपनीकडून सादर झाला आहे. विकास आराखड्यातही हा रिंगरोड दर्शविण्यात आला आहे. विकास आराखड्यास मान्यता मिळाल्यानंतर तातडीने काम हाती घेणे शक्य होणार आहे.
- अशोक भालकर, मुख्य अभियंता, अभियांत्रिकी विभाग