पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) पुनर्विकासाचे काम करणाऱ्या ‘आरएलडीए’ने (रेल्वे लँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) नुकतेच पुणे रेल्वे प्रशासनाला स्थानक विकासांतर्गत उभारण्यात येणाऱ्या पार्किंगचा प्रस्ताव पाठविला. यात जुना मालधक्का, रेल्वे रुग्णालय अथवा पुणे बस स्टेशनच्या जागेजवळच्या भागात मल्टिलेव्हल कार पार्किंगचा प्रस्ताव दिला. मात्र, तो रेल्वे प्रशासनाला मान्य नाही. त्यामुळे दुसरा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत.
पुणे रेल्वे स्थानकाच्या विकासाची जबाबदारी आधी ‘आयआरएसडीसी’ला (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कार्पोरेशन) देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून काहीच कामे न झाल्याने रेल्वे बोर्डाने ही जबाबदारी ‘आरएलडीए’कडे सोपवली. याला देखील वर्ष - दीड वर्षे होऊन गेले. आता कामाबाबत काही प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, ‘आरएलडीए’चा प्रस्ताव व्यवहारिक नसल्याने या आधीदेखील रेल्वे बोर्डाच्या सदस्यांनी तो फेटाळला होता. आताही सादर केलेला प्रस्ताव पुणे रेल्वे प्रशासनाने फेटाळला आहे.
काय होते प्रस्तावात?
पुणे स्थानकाच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मल्टिलेव्हल कार पार्किंगचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी जुन्या मालधक्का, रेल्वे रुग्णालय व राज्य परिवहन महामंडळाची पुणे स्टेशन बस स्थानकाची जागा या तीन जागांचा विचार झाला. यापैकी एका जागेत मल्टिलेव्हल कार पार्किंगचा पर्याय सुचविला गेला आहे. तसेच पार्सलच्या बाजूने एक गेट करून तिथून स्टेशनमधून बाहेर पडण्याचा रस्ता तयार करण्यासही सुचविले आहे. मात्र, हे पर्याय व्यवहार्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
‘आरएलडीए’ने पार्किंगसंदर्भातला प्रस्ताव दिला. मात्र, त्यात रुग्णालय पाडून त्याजागी वाहनतळ करावे, असे सांगितले आहे. तर जुन्या मालधक्याच्या जागी प्रास्तवित महारेलचे स्थानक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव व्यवहार्य नाही. त्यांना पुन्हा दुसरा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असून, येत्या चार ते पाच दिवसांत तो सादर होईल, अशी अपेक्षा आहे.
- ब्रिजेशकुमार सिंग, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे