पुणे (Pune) : कोरेगाव पार्क येथून कल्याणीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कल्याणी चौकात सिग्नलला न थांबता डावीकडे वळता (लेफ्ट फ्री) येणार आहे. त्यामुळे कल्याणीनगरकडे जाताना सिग्नल लागल्यानंतर चौकात थांबण्याची डोकेदुखी आता कमी होणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चालकांची गैरसोय टळणार आहे.
कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रस्त्यावरील लेन क्रमांक ७वरील स्मशानभूमीपासून ते कल्याणी चौकातून कल्याणीनगरकडे जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. मात्र, सकाळी रहदारीच्या वेळी कल्याणी चौकातील सिग्नल सुटेपर्यंत वाहनचालकांना डावीकडे वळून कल्याणी चौकातून कल्याणीनगरच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. त्यामुळे तीन ते चारवेळा सिग्नल लागल्यानंतर नागरिकांना डावीकडे वळून कल्याणीनगरला जाता येते.
त्यामुळे वाहनचालकांचे १५ ते २० मिनिटे वाहतूक कोंडीमध्ये जातात. मात्र, कोरेगाव पार्कवरून कल्याणीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना कल्याणी चौकाकडे जाण्यासाठी डावीकडे वळण्यासाठीची सुविधा दिल्यास वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे चौकात वाहतूक कोंडीचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे.
यादृष्टीने महापालिकेच्या पथ विभागाने नॉर्थ मेन रस्ता नंबर ७ वरील स्मशानभूमी ते कल्याणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला वेग दिला आहे. हे काम करत असतानाच वाहनचालकांना कल्याणी चौकातील सिग्नलला न थांबता, त्यांना डावीकडे वळणे सोपे होईल, यादृष्टीने रस्ता तयार करण्यात येत आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे कल्याणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटेल, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.