पुणे (Pune) : शहरात वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहनांवरील बंदीची पोलिसांकडून कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच ट्रिपल सीट, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत सुमारे २५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असून, दोनशेहून अधिक वाहने जप्त केली आहेत. विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास सहा महिन्यांसाठी वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
शहरात भरधाव आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वचक राहावा, यासाठी वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत दोनशेहून अधिक वाहने जप्त केल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
अवजड वाहनांवर बंदी
शहरात विविध ठिकाणी इमारतींचे बांधकाम आणि विकासकामे सुरू आहेत. परंतु वर्दळीच्या कालावधीत डंपर, कॉंक्रिट मिक्सर अशा अवजड वाहनांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
पुणे शहर वाहतूक शाखेकडून कारवाई (१ ते १६ ऑक्टोबर) -
२१ हजार २८५ : विरुद्ध दिशेने येणारे वाहनचालक
२ हजार ८७२ : ट्रिपल सीट
५७० : ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह
२१५ : जप्त वाहने