पुणे (Pune) : पुणे-नांदेड-खडकवासला ते पानशेत रस्त्याची रुंदी पूर्वीपेक्षा दुप्पट झाल्याने वाहने वेगाने धावतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गांवर रिफ्लेक्टर लावणे, पांढरे पट्टे मारणे, गतिरोधक करणे, माहितीफलक बसविणे, वाळू साफ करणे, ही कामे तातडीने करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होते आहे.
नांदेडपासून ते डोणजे फाटापर्यंत हा रस्ता कॉंक्रिटचा झाला आहे. तर डोणजेपासून ते पानशेतपर्यंत हा रस्ता डांबरीकरणाचा झाला आहे. गोऱ्हे बुद्रुक येथे तीव्र वळण आहे. येथे विरुद्ध बाजूने येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे वाहनाचा वेग कमी करण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. सिंहगड पानशेत व वेल्हे अशी पर्यटन ठिकाणे आहेत. परिणामी प्रामुख्याने गुरुवार, शनिवार व रविवारी या परिसरात वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याची १० वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
काँक्रिट रस्त्याची पातळी एकसारखी नाही. खडकवासला, डोणजे, खानापूर येथील पुलाची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. मालखेड, सोनापूर येथे रस्त्याला खड्डे पडले आहेत. ते खड्डे बुजविण्याची मागणी सहकार आघाडीचे जिल्हाप्रमुख लहू निवंगुणे यांनी केली आहे.
रस्ता रुंद झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. शाळेतील मुलांना, ज्येष्ठ नागरिक, महिलांना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. गाव व शाळेच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारावेत. पर्यटकांना दृष्टीने गाव, शाळा, वळण, अरुंद रस्ता याची माहिती नसते. याचे माहिती फलक जास्त बसवावेत. अशी मागणी आम्ही संस्थेमार्फत आमदार तापकीर यांच्याकडे केली आहे.
- बाजीराव पारगे, अध्यक्ष, दिव्यांग विकास संस्था
गोऱ्हे बुद्रुक येथील हॉटेल कोंढाणासमोर तीव्र वळणावर मोठे अपघात झाले आहेत. सध्या रस्त्यालगत वाळू साठल्याने दुचाकीवाहने घसरत आहेत. मागील १५ दिवसांत दोन-तीन अशा घटना घडल्या आहेत.
- संतोष खिरीड, ग्रामस्थ, गोऱ्हे बुद्रुक
गोऱ्हे बुद्रुक येथील वळण धोकादायक आहे. या ठिकाणी समोरून येणारे वाहने दिसत नाही. येथे अपघात होण्याची शक्यता आहे. गतिरोधक करावेत. ब्लिंकर बसविणे, दोन्ही बाजूला माहिती फलक लावावेत.
- संतोष जावळकर, ग्रामस्थ, खानापूर
पानशेत रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे नियोजन आहे. गाव, शाळा, वळण, अरुंद रस्ता माहिती फलक बसविण्यात येईल. रिफ्लेक्टर लावणे, पांढरे पट्टे मारणे, गतिरोधक करणे, याबाबत प्रत्यक्ष पाहणी योग्य त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येतील.
- ज्ञानेश्वर राठोड शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग