पुणे (Pune) : पुणे शहरातील १२ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते महापालिकेच्या (PMC) मुख्य पथ विभागाकडे येतात. आम्ही त्यांचीच देखभाल दुरुस्ती करतो, असे अधिकारी सांगतात. त्यामुळे गल्लीबोळातील डांबरीकरणाकडे, खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष होते. अशा वेळी क्षेत्रीय कार्यालयांकडे बोट दाखविण्यात येते.
दरम्यान, पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले असताना मुख्य खात्याकडून काही ठिकाणी १२ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर डांबरीकरण केले जात आहे. केवळ खडीमिश्रित डांबर आंथरण्यावरच भर असून, त्याची गुणवत्ताही राखली जात नसल्याचे समोर आले आहे.
रस्ता करून अनेक वर्षे झाली आहेत, खड्डे पडले आहेत, खडी निघत आहे, अशा रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण केले जात आहे. या कामाला उन्हाळ्यामध्ये भर दिला जातो. त्यामुळे ३० एप्रिलनंतर रस्ते खोदायला बंदी घालण्यात आली आहे. १ मे ते १५ जूनच्या दरम्यान ज्या ठिकाणी खोदकाम झाले आहे तेथे समतल करून रस्ते पूर्ववत केले जातात. पण सध्या ज्या भागांत खोदकाम झालेले नाही तेथे समतलची कामे सुरू आहेत.
‘‘मुख्य खाते १२ मीटरपेक्षा लहान रस्त्याकडे लक्ष देत नाही. पण दिले तर चांगले काम केले पाहिजे. धायरीत डांबरीकरण करताना नियमांचे पालन करण्यात आले नसल्याने निकृष्ट काम झाले आहे. पावसाळी चेंबर खडी पडून बुजले आहेत. प्रशासनाने कामात सुधारणा करावी’’, असे मत काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
पॅचवर्क करून दुरुस्ती
येरवडा येथे महापालिकेचा हॉटमिक्स प्लांट असून तेथून रोज सुमारे ७०० टन हॉटमिक्स डांबराचा वापर शहरातील १२ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांचे डांबरीकरण, खड्डे बुजविणे यासाठी केला जात आहे. ७०० टन हॉटमिक्स मालाचा वापर करून सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम होते. पण हा माल एकाच रस्त्यावर न वापरता पथ विभागाच्या सात विभागात वितरित करून छोटेछोटे पॅचवर्क करून रस्ते दुरुस्त केले जात आहेत.
अर्धवट, निकृष्ट डांबरीकरण
शहरात लहान गल्ल्यांमध्ये चारचाकी, दुचाकी वाहने पार्क केलेली असतात तेथे कोणतीही पूर्वसूचना न देता रात्रीतून थेट डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे ज्या येथे चारचाकी गाड्या लावलेल्या आहेत त्यांच्या खालच्या भागात डांबरीकरण झालेले नाही. तसेच साइडपट्टी मारलेली नाही. डांबरीकरण करताना पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरमधून खडी आत पडल्याने वाहिन्या बुजल्या आहेत. त्यामुळे नवे प्रश्न निर्माण होत आहेत.
येरवडा हॉटमिक्स प्लांटमधून रोज ६०० ते ७०० टन माल रस्ते समतलसाठी वापरले जात आहे. १२ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यावरील खराब झालेले रस्ते दुरुस्त केले जात आहेत. एक मेनंतर रस्ते दुरुस्तीच्या कामाची गती वाढले.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका