पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकावर (Pune Railway Station) सामान्य प्रवाश्यांना ना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय आहे, ना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. स्थानकावर कोणत्याच प्रकारची तपासणी होत नाही, सीसीटीव्ही कॅमेरांची संख्या देखील कमी आहे. जे कॅमेरे आहेत ते कुचकामी आहेत. त्यामुळे प्रवाशांना ना पिण्याचे पाणी व ना सुरक्षेची हमी असल्याची भावना पुणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्यांनी मांडली आहे.
पुणे रेल्वे प्रशासन व पुणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्यांची बुधवारी दुपारी पुणे स्थानकावरच्या व्हीआयपी रूममध्ये बैठक झाली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
या मुद्द्यांवर झाली चर्चा
- प्रवाशांना बसण्यासाठी विश्रांती कक्ष नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल.
- आरपीएफचे अपुरे मनुष्यबळ, त्यामुळे प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर.
- पुणे स्थानकावर अनधिकृतपणे प्रवेश करणे सहज सोपे.
प्रवासी सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ती पाउले उचलणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह प्रत्यक्षात आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांचा देखील वावर वाढवायला हवे.
- आनंद सप्तर्षी, स्टेशन सल्लागार समिती सदस्य, पुणे