पुणे (Pune) : पुणे शहरातील (Pune City) खड्डे बुजविण्याच्या कामाला गती येत नसल्याने आता ९ ऑगस्टपर्यंत कामे पूर्ण करा; अन्यथा थेट पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा गुरुवारी झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांकडून देण्यात आला. खड्डे बुजविताना सर्वाधिक वर्दळ असलेल्या ९२ किलोमीटर लांबीच्या प्रमुख १५ रस्त्यांसह त्यांना जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी यासंदर्भात आज पथ विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने पडलेले रस्त्यांवरील खड्डे महापालिकेकडून हॉटमिक्स, कोल्डमिक्स, मुरूम टाकून खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या पावसाने उघडीप घेतल्याने खड्डे बुजविण्याचे काम गतीने करणे आवश्यक आहे. मात्र, महापालिकेचा येरवड्यातील हॉटमिक्स प्लांट बंद पडल्याने या कामात अडथळा निर्माण झाला आहे.
ढाकणे यांनी घेतलेल्या बैठकीत कार्यकारी अभियंत्यांनी त्यांच्या हद्दीतील मुख्य रस्ते आणि जोड रस्ते एकत्र येतात, अशा चौकातील खड्डे तातडीने बुजवावेत. तसेच शहरातील १५ प्रमुख रस्त्यांची यादी तयार केली आहे. अशा रस्त्यांची दुरुस्ती ९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत. यानंतर या रस्त्यावर खड्डे दिसल्यास या रस्त्यांची जबाबदारी असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा बैठकीत दिला आहे.
हॉटमिक्स प्लांट बंदच
बेअरिंग खराब झाल्याने महापालिकेचा हॉटमिक्स प्लांट बंद पडला आहे. तो आज सुरू होणे अपेक्षित होते, पण गुरुवारी (ता. ३) रात्रीपर्यंतही दुरुस्तीचे काम सुरूच होते. त्यामुळे दिवसभरात खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आली नाही. तसेच ठेकेदाराकडून माल घेऊन खड्डे बुजविले जात आहेत.
हे आहेत प्रमुख १५ रस्ते आणि त्यांची लांबी ( लांबी किलोमीटरमध्ये)
नगर रस्ता - १४
सोलापूर रस्ता - ६
मगरपट्टा रस्ता - ७
पाषाण रस्ता - ३.५
बाणेर रस्ता - ७.५
संगमवाडी रस्ता - ४.३
विमानतळ व्हीआयपी रस्ता - ४.५
कर्वे रस्ता -६.५
पौड रस्ता - ४.३
सातारा रस्ता - ७
सिंहगड रस्ता - ९
बिबवेवाडी रस्ता - ४.५
नार्थमेन रस्ता -३.६
गणेशखिंड रस्ता - ३.३
बाजीराव रस्ता - ७
शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा आज आढावा घेतला. महत्त्वाच्या १५ रस्त्यांसह इतर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येक रस्त्यासाठी कनिष्ठ अभियंत्याची जबाबदारी निश्चित केली आहे. नऊ ऑगस्टनंतर रस्त्यावर खड्डे दिसल्यास संबंधित कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई केली जाईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका