पुणे (Pune) : पीएमपी (PMPML) प्रशासनाने संचलनातील तूट कमी करण्यासाठी कमी प्रतिसाद असलेल्या मार्गावरील सकाळी व रात्रीच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. निगडी, हडपसर व भोसरीच्या डेपोच्या अशा फेऱ्या रद्द करण्यास सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्यात या तीन डेपोच्या फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यानंतर उर्वरित १२ डेपोच्या कमी प्रतिसाद मिळत असलेल्या फेऱ्या बंद केल्या जाणार आहेत. यामुळे पीएमपीच्या खर्चात घट होईल. मात्र, प्रवाशांना काही प्रमाणात फटका बसणार आहे. विशेषतः रात्री घरी जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.
‘पीएमपी’च्या सुमारे १८०० बसच्या माध्यमातून ३८९ मार्गावर सेवा दिली जाते. यात पुणे, पिंपरी चिंचवड व पीएमआरडीए क्षेत्राचाही समावेश आहे. आता पीएमपीने बंद केलेल्या फेऱ्या या प्रामुख्याने ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत. यापूर्वीही पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागातील सेवा बंद केल्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यात लक्ष घालून तोट्यातील फेऱ्या सुरू करण्याचे आदेश दिले.
शिवाय त्याचा खर्च पीएमआरडीएला उचलण्यास सांगितले होते. आता पुन्हा तुटीचे कारण सांगत पीएमपी रात्रीच्या फेऱ्या बंद करीत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
कमी प्रतिसादाच्या तीन डेपोच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. उर्वरित १२ डेपोच्याही कमी प्रतिसादाच्या फेऱ्या टप्याटप्याने बंद केल्या जातील. प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ.
- सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल, पुणे