पुणे (Pune) : महापालिकेने पुणे महानगर परिवहन महामंडळाला (PMPML) दिलेल्या जकात नाक्यांच्या चार जागांवर बस आगाराची (Bus Depot) कामे पूर्ण झाली असून, त्यांचा वापर सुरू झाला आहे. मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी ‘पीएमपी’ला त्यांच्या बस रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता ‘पीएमपी’ला बस आगारासाठी आणखी मोठ्या जागा मिळण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहराच्या वेगवेगळ्या भागातील जकात नाके काही वर्षांपूर्वी बंद झाले. महापालिकेने त्यांच्याकडील या नाक्यांच्या जागा काही वर्षांपूर्वी ‘पीएमपी’ला नाममात्र दराने वापरासाठी दिल्या. त्यामुळे रस्त्यांवर थांबणाऱ्या पीएमपी बसला काही प्रमाणात आगाराचा आधार मिळण्याची चिन्हे दिसू लागली. महापालिकेने बालेवाडी, शेवाळवाडी, भेकराईनगर, शिंदेवाडी या चार ठिकाणच्या जकात नाक्यांची जागा उपलब्ध करून दिल्या होत्या.
त्यातील बालेवाडी, शेवाळवाडी व भेकराईनगर येथे प्रत्यक्षात आगार सुरू झाले. शिंदेवाडी येथे स्क्रॅपगार्ड तयार केले. तेथे टायर, लोखंड व विविध प्रकारचे भंगाराचे साहित्य टाकण्यासाठी संबंधित जागेचा वापर सुरू केला.
आणखी ३५ बस आगारांसाठी हवी जागा
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या (सीआयआरटी) नियमानुसार एक लाख प्रवाशांसाठी किमान ५० बसची गरज असते. पुण्याची लोकसंख्या ७० लाखांपेक्षा जास्त आहे. त्यानुसार किमान साडेतीन हजार बसची पुण्याला गरज आहे. या बससाठी किमान ३५ आगारांची गरज आहे. सध्या ‘पीएमपी’कडे दोन हजार १०० बस आहेत. त्यासाठीही प्रत्यक्षात २१ आगारांची आवश्यकता आहे. जकात नाक्यांप्रमाणे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यांच्याकडून पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध झाल्यास आगारांचा प्रश्न गतीने सुटण्यास मदत होऊ शकते.
येथील जागांना आगारांसाठी प्राधान्य
सिंहगड रस्ता, वारजे-माळवाडी, हिंजवडी व कोंढवा या चार ठिकाणांहून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तेथे बस आगार असणे आवश्यक आहे. मात्र जागेच्या अभावामुळे आगार करण्यासाठी पीएमपी प्रशासनाला मर्यादा येऊ लागली आहे. त्यामुळे प्रवाशांवरही त्याचा परिणाम होत आहे.
आम्ही गणपती माथा वारजे परिसरात राहतो. नोकरीसाठी पिंपरी-चिंचवडला जावे लागते. वारजे माळवाडी किंवा उत्तमनगर, शिवणे येथून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. या परिसरात बस आगार झाल्यास बसची संख्या वाढेल, परिणामी गैरसोय टळू शकेल.
- विजया उघडे, प्रवासी
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भविष्यात आणखी आगार करावे लागणार आहेत. या आगारांसाठी पुरेशा प्रमाणात जागा मिळण्याची गरज आहे.
- अनंत वाघमारे, प्रमुख, मालमत्ता विभाग, पीएमपी
‘पीएमपी’चा डोलारा
- ‘पीएमपी’कडे सध्या उपलब्ध बसची संख्या ः २१००
- ‘सीआयआरटी’नुसार १ लाख प्रवाशांसाठी बसची गरज ः ५०
- ‘सीआयआरटी’नुसार ७० लाख लोकसंख्येसाठी बसची संख्या ः ३५००
- ‘सीआयआरटी’नुसार भविष्यात लागणाऱ्या आगारांची गरज ः ३५
- सध्या असलेल्या आगारांची संख्या ः १०
- जकात नाक्यांच्या ठिकाणची नवीन आगार ः ४
- सध्या उपलब्ध बससाठी आणखी आगारांची गरज ः २१