पुणे (Pune) : रोजंदारीने कामावर जाणाऱ्या कामगारांनाही मोफत उपचारांचा लाभ घेता यावा, यासाठी राज्य शासनाने पुण्यात ५८ ठिकाणी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यास सांगितले होते. परंतु, आतापर्यंत त्यापैकी केवळ एकच दवाखाना सुरू करण्यात पुणे महापालिकेला यश आले आहे. ३३ दवाखाने सुरू करू शकत नसल्याचे महापालिकेने राज्य शासनाला कळवले असून, उर्वरित २४ दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत, पण त्याला मुहूर्त कधी लागेल हे अद्याप गुलदस्तात आहे.
नियमित सरकारी दवाखान्यांचा बाह्यरुग्ण विभाग हा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत सूरू असतो. त्याच कालावधीत रोजंदारीने कामावर जाणारे कामगार तसेच असंघटित कामगारही कामावर जातात. ते कामावरून परत आल्यावर सरकारी दवाखाने बंद झालेले असतात. त्या कालावधीत त्यांना गरज असतानाही उपचार घेता येत नाहीत.
अशा वेळी, त्यांना सायंकाळी किंवा रात्री उपचार घेता यावेत, यासाठी दोन वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर २०२२ ला राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यांना व महापालिकांना ‘आपला दवाखाना’ सुरू करायला सांगितले होते. त्यांची वेळ ही दुपारी दोन ते रात्री १० वाजेपर्यंत आहे. परंतु, आज या निर्णयाला दोन वर्षे उलटली तरीही शहरात केवळ एकच दवाखाना शिवाजीनगर येथील चाफेकर चौकात सुरू करण्यात महापालिकेला यश आलेले आहे.
असा आहे ‘आपला दवाखाना’
१) कामगारांना किंवा कोणालाही दुपारी दोन ते रात्री १० वाजेपर्यंत मोफत उपचार घेता येणार
२) यामध्ये रक्त तपासणी, एक्स रे व इतर निदान सुविधा मोफत मिळणार
३) भाडे तत्त्वावरील जागेत सुरू करण्याची सोय, त्यासाठी राज्य सरकार प्रतिमाह एक लाख रुपयांचे भाडे देणार
४) डॉक्टर, परिचारिका, औषध निर्माण अधिकारी यांची नियुक्ती तसेच त्यांचे वेतन व दवाखाना उभा करण्याचा तसेच फर्निचरचा खर्च राज्य सरकार देणार
शहरासाठी ५८ ठिकाणी ‘आपला दवाखाना’ हा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यापैकी एक सुरू झाला असून आणखी २४ ठिकाणी सुरू करण्यात येतील. बाकी उरलेले ३३ दवाखाने जागेअभावी राज्य शासनाला पुन्हा समर्पित केले आहेत. उरलेल्या २४ दवाखान्यांसाठी जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी काही जागा भाडे तत्त्वावरील आहेत. दवाखाने सुरू करण्यासाठी नोडल अधिकारी यांना पत्र दिले आहे.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
पुण्यात २४ ते २५ ठिकाणी ‘आपला दवाखाना’ प्रकल्प सुरू करायचा आहे, पण या बाबी आचारसंहिता संपल्यावरच पूर्ण होतील. महापालिकेने काही दवाखाने शासनाला परत केले आहेत का, याची माहिती महापालिकेने दिलेली नाही.
- डॉ. नागनाथ यमपल्ले, पुणे जिल्हा शल्यचिकित्सक तथा नोडल अधिकारी, ‘आपला दवाखाना’