पुणे (Pune) : राज्यभरातील नाट्यगृहांची दुरवस्था आता नवीन नाही. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी अशा सगळ्याच शहरांतील नाट्यगृहांमधील असुविधांबाबत वारंवार तक्रारी होत आहेत.
पुण्याच्या सर्वच नाट्यगृहांची, विशेषतः बालगंधर्व रंगमंदिराची अवस्थाही त्यापेक्षा वेगळी नाही. किंबहुना अधिकच बिकट आहे. खरेतर या नाट्यगृहाचा इतिहास आणि त्याच्या रचनेमुळे अनेक कलाकार हे आपले आवडते नाट्यगृह असल्याचे आवर्जून नमूद करतात. पण, त्याच्या देखभालीबाबत प्रशासनाची असलेली अनास्था, यामुळे हे सर्वांचे ‘नावडते नाट्यगृह’ होण्यास वेळ लागणार नाही. नाट्यगृहाची इतकी बिकट अवस्था होऊनही प्रशासन खुशाल डोळेझाक करत आहे.
कलाकार, नाट्यरसिक आणि राजकीय नेतेमंडळींनी वारंवार व्यवस्थापनाकडे तक्रारी करूनही बालगंधर्व रंगमंदिरातील डासांचा उच्छाद कायम आहे.
दोन दिवसांपूर्वी चालू प्रयोगात रंगमंचावर टाळी वाजवण्याचा अभिनय करून डास मारण्याची पाळी कलाकारांवर ओढवली. स्वच्छतागृह तुंबणे हा तर येथे नित्याचाच भाग झाला आहे. सातत्याने कंठशोष करूनही दाद मिळत नसल्याने झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार?, असा उद्विग्न सवाल कलाकार, रसिकांनी विचारला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून बालगंधर्व रंगमंदिरात नाटकासह विविध कार्यक्रम सुरू आहेत. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या प्रतिनिधींनी व्यवस्थापकांची वैयक्तिक भेट घेऊन अडचणी मांडल्या. या अडचणी दूर करण्याचे तोंडी आश्वासन व्यवस्थापकांनी दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. अनेकदा रात्रीच्या नाट्यप्रयोगांना तर वातानुकूलित यंत्रणा बंद असते, उपहारगृहही बंद असते. शिवाय, डास प्रेक्षकांना फोडून काढतात ते वेगळेच.
मात्र, प्रेक्षकांच्या या तक्रारी ऐकून घेण्यासाठी तिथे प्रशासनाचा एकही प्रतिनिधी उपलब्ध नसतो. कलाकारांच्या मेकअप रुममधील स्वच्छतेची व्यवस्था तर कलाकार आपल्याच खिशातून पैसे खर्च करून करतात. या अडचणींबाबत व्यवस्थापक विजय शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
नाशिकचा आदर्श घेणार का?
नाशिक महापालिकेच्या अखत्यारितील कालिदास कलामंदिर या नाट्यगृहात काही दिवसांपूर्वी ‘संज्या छाया’ या नाटकाचा प्रयोग झाला. या वेळी नाट्यगृहाची वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने प्रेक्षकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अभिनेते वैभव मांगले यांनी याबाबत समाजमाध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याची तात्काळ दखल घेत महापालिका प्रशासनाने नाट्यगृहाच्या व्यवस्थापकांना निलंबित केले.
बालगंधर्व रंगमंदिराबाबत सततच्या तक्रारी असूनही व्यवस्थापक त्याबाबत काही करत असल्याचे तर दिसून येत नाही. त्यामुळे नाशिकचा आदर्श घेत पुणे महापालिकेच्या प्रशासनाने पण कारवाईचा बडगा उगारावा, असा मतप्रवाह रसिकांमध्ये आहे.
बालगंधर्व रंगमंदिरात प्रत्येक प्रयोगात डासांचा त्रास जाणवतो. अगदी रंगमंचावर आणि विंगेतही. नुकत्याच एका प्रयोगात माझ्या खोलीतील स्वच्छतागृह तुंबलेले होते. खोली बदलून घेतली तरी स्वच्छतागृहाची अवस्था तशीच होती. ही परिस्थिती खरोखरच उद्विग्न करणारी आहे.
- अमृता देशमुख, अभिनेत्री