पुणे (Pune) : वारजे येथे महामार्गावरील पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्या खालील मातीचा भराव खचल्याने एक लेन बंद झाली होती. ही लेन पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरू असून त्यावरील वाहतूक बुधवारी सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) व वारजे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पश्चिम बाह्यवळण महामार्गावर साताऱ्याला जाणाऱ्या बाजूच्या ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. भराव खचण्याची घटना सोमवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास घडली होती. येथे तीन पदरी रस्ता आहे. नव्या पुलाचे काम सुरू असल्याने फक्त अडीच लेन सुरू असायच्या. मात्र, भराव ढासळण्याच्या प्रकाराने आता फक्त दीड लेन वाहतुकीसाठी सुरू आहे.
ही दुरुस्ती पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच ते सहा दिवस लागणार आहे. बुधवारपर्यंत पूर्वीप्रमाणे अडीच लेन सुरू होतील, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वारजे वाहतूक विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
पश्चिम बाह्यवळण महामार्गावर इतर दिवसांपेक्षा दर शुक्रवारी संध्याकाळनंतर वाहतूक कोंडी जास्त होती. भराव खचल्याने दीड लेन सुरू असल्याने वाहतूक अधिक कोंडी झाली होती. मातीचा भराव दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. दुरुस्तीचे काम मंगळवारी पूर्ण होईल. बंद लेन बुधवारपासून वाहतुकीस खुली होईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.
वाहनांच्या रांगा दुपारी चार वाजता डुक्कर खिंडीपर्यंत जातात. महामार्गावर वाहतूक कोंडीची वेळ रात्री ११- १२ वाजेपर्यंत वाढली आहे. शुक्रवारी डुक्कर खिंडीतून महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्याला येऊ दिली नाही. परिणामी सेवा रस्त्याला वाहतूक कोंडी कमी झाली होती.
- विशाल पवार, सहायक पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग
स्थानिक नागरिकांना महामार्गाच्या उड्डाणपुला खालून जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नदीच्या पुलाच्या अलीकडे सकाळी दिवसभर फळांच्या हातगाड्या रस्त्यावर असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत अनेकदा भर पडते.
- प्रशांत रोहकले, स्थानिक नागरिक