पुणे (Pune) : स्थानिक स्वराज्य संस्था नसल्याने फुरसुंगी (Fursungi) आणि उरुळी देवाची (Uruli Devachi) या गावांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. नगरपालिका की महापालिका याचा निर्णय लवकर व्हावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
या दोन गावांचा महापालिकेत चार वर्षांपूर्वी समावेश केला होता. पालिकेचा वाढीव मिळकत कर आणि मिळणाऱ्या सुविधांमध्ये तारतम्य नसल्याने गावातील काही नागरिकांकडून पालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती निदान कर तरी कमी होता, असे जनमत झाले आणि पालिकेतून वगळण्याची मागणी वाढली.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून या गावांसाठी नवीन नगरपालिकेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार प्रक्रियाही चालू झाली, मात्र अजूनही निर्णय झाला नसल्याने नागरिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. सध्या ना महापालिकेत ना नगरपालिकेत अशी स्थिती झाली आहे.
या दोन्ही गावातील विकासकामांवर याचा परिणाम झाला आहे. नवीन प्रकल्प बंद झाले आहेत. महापालिकेतून वगळल्याने निधी नसल्याचे कारण देत पालिकेकडून या भागात केवळ दुरुस्तीची कामे होत आहेत. रस्त्याची दुरवस्था झाल्याने चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा आहे. पाणीपुरवठा विस्कळित झाल्याने विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्याचा आर्थिक बोजा कुटुंबाला सोसावा लागत आहे.
सांडपाणी वाहिन्या नव्याने बसवणे गरज आहे. जुन्या वाहिन्यांवर भार येऊन वारंवार गळती होत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याचे स्थानिक रहिवासी महेंद्र सरोदे, दत्ता कामठे, जितेंद्र कामठे, संतोष डाफळे, आकाश बहुले, सचिन अडसूळ यांनी सांगितले.
प्रलंबित कामे
- मलनिस्सारण वाहिनीचे नियोजन
- बंद जलवाहिन्यांचे जाळे
- रस्त्यांचे रुंदीकरण
- अखंडित विद्युत पुरवठा
- सरकारी शाळांचे नियोजन
- पावसाळी वाहिन्या
- उद्यान निर्मिती
- खेळण्यासाठी मैदाने
नगरपालिका असो की महापालिका निर्णय होणे गरजेचे आहे. विकास कामे रखडली आहेत. मूलभूत सुविधा मिळण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल या विचाराने नागरिक चिंतेत आहेत.
- संतोष हरपळे, स्थानिक नागरिक