Pune News पुणे : मुळशी (Mulashi) तालुक्यातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दारवली येथे एकेरी मार्गाचेच काम झाले आहे. उर्वरित दुसऱ्या मार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे. एकेरी मार्गामुळे याठिकाणी अपघात होत असून, अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे याठिकाणी दुसऱ्या मार्गाचे काम कोणत्या मुहूर्तावर सुरू होणार, हा प्रश्न मुळशीकरांनी उपस्थित केला आहे.
दारवली येथेही उताररस्त्याचे पाच वर्षांपूर्वीच एकेरी मार्गाचे काम झाले. पुणे, पिरंगुटहून पौडकडे येणाऱ्या गाड्यांना सुतारवाडी घाटातून रस्ता उताराचा असल्याने वेग असतो. परंतु, पुढे एकेरी मार्गामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कित्येकवेळा कच्चा रस्त्यात गाड्या पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे अर्धवट रस्त्यावर दुहेरी वाहतूक धोक्याची होवू लागली आहे. रात्रीच्यावेळी सर्रास अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत.
विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या रस्त्याच्या मधोमध मोठी भेगही पडू लागली आहे. दिवसेंदिवस ही भेग लांब आणि रुंद होत आहे. दारवली येथे ओढ्यावर मोरी बांधण्याचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे तिथे खड्डा पडला आहे. तसेच अर्धवट असलेल्या रस्त्यावर दगडमातीचे ढीग टाकलेले आहेत. त्यामुळे हा कच्चा रस्ताही वाहतुकीसाठी उपयोगात आणता येत नाही. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने सिमेंट कॉंक्रिटीकरण न केलेल्या रस्त्यावरील दगडमातीचा राडारोडा बाजूला केल्यास मूळ डांबरी रस्त्यावरून वाहतूक होवू शकते.
दुहेरी मार्गाच्या कामाकडे काणाडोळा
एकेरी मार्गामुळे यापूर्वी या रस्त्यावर दुचाकी, मोटारीची समोरासमोर धडक होऊन जीवघेणे अपघातही घडले आहेत. तर रस्त्याचा अंदाज न आल्याने कित्येक दुचाकी, मोटारी दुसऱ्या बाजूला पडल्या आहेत. येथील दुहेरी मार्गाचे काम करण्याबाबत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार काणाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.
याबाबत स्थानिक नागरिक, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधींनी ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदने दिली. त्यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगितले. परंतु रस्त्याचा दुसऱ्या मार्ग करण्याबाबत त्यांचे वेळकाढू धोरण सुरू आहे.