Pune News पुणे : पुणे बाजार समितीच्या (Pune APMC) गूळ-भुसार विभागात अनधिकृत बांधकामे पुन्हा सुरू झाली आहेत. अनेक भूखंड धारकांनी कोणतीही परवानगी न घेता पत्रा शेड, साइड शेडचे बांधकाम केले आहे. याची दखल घेत राज्याच्या पणन मंडळाच्या संचालकांनी बाजार समितीची मुद्देनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बाजार समितीबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने आणि प्राप्त झालेल्या निवेदनांच्या आधारे बाजार समितीची चौकशी करण्याचे आदेश पणन संचालक विकास रसाळ यांनी दिले आहेत. यासाठी पणन मंडळाचे उपसंचालक मोहन निंबाळकर यांची नियुक्ती केली आहे. याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
दरम्यान, पुणे बाजार समितीच्या सुमारे २३ वर्षांपूर्वीच्या गैरकारभारासंदर्भात तत्कालीन संचालकांवर जबाबदारी निश्चितीची बजावलेली नोटीस पणनमंत्र्यांनी वैध ठरवून याबाबत ६० दिवसांत चौकशी करून कारवाईचे आदेश काही महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र, चौकशी अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही. आता बाजार समितीवर संचालक मंडळ येऊन तेरा महिने उलटले आहे.
या काळात बेकायदा बांधकामे, टेंडरसह विविध कामकाजावर आरोप झाले आहेत. याबाबत वृत्तपत्रांमध्ये अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे पणन संचालक विकास रसाळ यांनी बाजार समितीच्या कारभाराबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, चौकशी अहवाल कधी देण्यात यावा, याची कोणतीही मुदत दिलेली नाही.