Pune पुणे : केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यानंतर येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात उड्डाणपूल (Flyover) व ग्रेडसेपरेटरचे काम सुरू करण्यात आले आहे.
काही वर्षात झालेले वाहतूक व अन्य बदल लक्षात घेऊन पूर्वीच्या आराखड्याऐवजी सुधारित आराखडा तयार केला जात आहे. सुधारित आराखड्यानुसार पुलाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी सल्लागारांकडून सध्या वाहतूक सर्वेक्षण, माती परिक्षण या स्वरूपाचे काम सुरू करण्यात आले आहे.
PMC येरवड्यातील शास्त्रीनगर चौकामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाने विकास आराखड्याअंतर्गत चौकामध्ये उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन केले होते. मात्र, उड्डाणपूल व भुयारी मार्ग करण्याच्या ठिकाणापासून काही अंतरावरच आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू असल्याने संबंधित काम सुरू करण्यासाठी महापालिकेस केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ पाहिजे होते.
त्यासाठी महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी ५ एप्रिल २०२४ रोजी दिल्लीत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणासमोर दृकश्राव्य सादरीकरणही केले होत. त्यानंतरही ‘एनओसी’साठी संबंधित विभागाकडे महापालिकेचा पाठपुरावा सुरू होता. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
दरम्यान, केंद्र व राज्य पुरातत्त्व विभागाने मे महिन्यात एनओसी दिल्याने हे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. संबंधित उड्डाणपूल व भुयारी मार्गासाठी महापालिकेने आराखडा तयार केला होता, मात्र वाढलेली वाहने, वाहतुकीतील बदल व अन्य वेगवेगळ्या कारणांमुळे जुन्या आराखड्यानुसार काम करण्यास अडचण येत होती. त्यामुळे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने सल्लागार नेमून सद्यःस्थिती मांडणारा नवीन आराखडा तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
संबंधित सल्लागारांकडून सध्या सर्वंकष विकास आराखड्यानुसार आखणी, वाहतूक सर्वेक्षण, माती परिक्षण या स्वरूपाची कामे केली जात आहेत. ही कामे झाल्यानंतर त्यांच्याकडून महापालिकेस पर्याय सुचविले जातील. त्यातील योग्य पर्यायाची निवड करून पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या कामाचे टेंडर निघणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शास्त्रीनगर चौकातील पुलाच्या कामास पुरातत्त्व विभागाकडून परवानगी मिळाली आहे. सद्यःस्थितीमध्ये अनेक बदल झाले आहेत. ते बदल लक्षात घेऊन नवीन आराखड्यानुसार पुलाचे काम केले जाणार आहे. सध्या सल्लागारांकडून डीपीआरनुसार आखणी, वाहतूक सर्वेक्षण, माती परिक्षण अशी कामे सुरू आहेत.
- अभिजित आंबेकर, कार्यकारी अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, पुणे महापालिका