Pune News पुणे : आम्ही कित्येक वर्षांपासून महापालिकेत (PMC) आलो आहोत. मिळकतकर, पाणीपट्टी नियमितपणे भरतो. परंतु आजही आमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आणखी किती वर्षे पाण्यासाठी टँकरभोवती (Water Tanker) फिरत रहायचे? किसन मोरे यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न केवळ एकट्या धायरी (Dhayari) गावाचा नाही, तर महापालिकेत प्रारंभी समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ही गावे महापालिकेत येऊन सहा ते सात वर्षे झाले, मात्र तेथील पाणीप्रश्न अद्याप कायम आहे.
संबंधित गावांना पाण्याच्या आवश्यकतेच्या निम्मा पाणीपुरवठादेखील होत नाही. याउलट दरवर्षी वाढत जाणाऱ्या टँकरच्या अर्थकारणामुळे या गावांचा घसा कायम कोरडा ठेवण्याचेच ‘हित’ साधण्यात आल्याचे वास्तव पुढे आले आहे. यामुळे गावांबरोबर समस्याही ‘समाविष्ट’ केल्या की काय अशी भावना नागरिकांमध्ये आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरातील उपनगरे, समाविष्ट गावांमधील पाणी प्रश्नाने तोंड वर काढले. हा प्रश्न समोर आल्यानंतर महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरवात केली. एप्रिल महिन्यामध्ये पाणी समस्या आणखी गंभीर झाली. संबंधित भागांमधील बोअरवेल, विहिरींमधील पाणी आटले. त्यामुळे नागरिकांना पाण्याच्या समस्येला आणखीनच तोंड द्यायची वेळ आली.
यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी समस्येचे गांभीर्य पुढे आले. मात्र, महापालिकेत २०१७ मध्ये समाविष्ट झालेल्या गावांचा पाणीप्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. महापालिका प्रशासन पुण्यासाठी समान पाणी पुरवठा योजना राबवीत असताना काही गावे वगळता उर्वरित गावांचा घसा मात्र कोरडाच ठेवण्यात आला आहे.
महापालिकेत २०१७ मध्ये लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (साडेसतरानळी), शिवणे (उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. या गावांमुळे ३३४.१६ चौरस किलोमीटरने महापालिकेचे क्षेत्रफळ वाढले. २०११ च्या जनगणनेनुसार संबंधित गावांमध्ये एक लाख ९८ हजार ६८१ इतकी लोकसंख्या होती, मागील १० ते १२ वर्षात ही लोकसंख्या सुमारे साडे सात लाखांपर्यंत पोचली. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढली.
महापालिकेकडून उपलब्ध जलवाहिन्या व टँकरद्वारे काही प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो. गावांच्या आवश्यक पाण्याच्या निम्मा पाणीपुरवठा देखील होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. मात्र अनेक गावांमध्ये पाणी साठवणूक करण्यासाठीच्या आवश्यक टाक्या नाहीत. उपलब्ध टाक्या जुन्या झाल्या असून त्यांचीही साठवणूक क्षमता संपलेली आहे.
टँकरमागचे अर्थकारण
महापालिका प्रशासनाने संबंधित गावांना पुरेसे पाणी देण्यासाठी ठोस उपाययोजना केली नाही. त्याद्वारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खासगी टँकरसाठी मोकळे रान करून दिले. त्यामुळे टँकर व्यावसायाच्या अर्थकारणाला बळ देण्याचा प्रयत्न होत असल्याचे उघड झाले आहे. महापालिकेच्या टँकर फेऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. टँकर भरण्यासाठी पाणी मिळते, मात्र तेच पाणी थेट लोकांना मिळत नसल्याची सद्यःस्थिती आहे.
समाविष्ट ११ गावांतील सद्यःस्थिती
- वर्ष २०२३
- लोकसंख्या ७२८३०४
- पाण्याची आवश्यकता १५२.३७ (एमएलडी)
- सध्याचा पाणी पुरवठा ६४.८१ (एमएलडी)
महापालिकेच्या टँकर फेऱ्यात झालेली वाढ
वर्ष..........२०२२.....२०२३....२०२४ (एप्रिल अखेरपर्यंत)
टँकर फेऱ्या....४००....४७२....५२७
पाणी समस्या निर्माण होत असलेल्या समाविष्ट ११ गावांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. या गावांना पाणी मिळण्यासाठी अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने सातत्याने पाठपुरावा केला आहे.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग
समाविष्ट गावांमधील पाणीप्रश्न गंभीर असून त्याचे चटके नागरिक सहन करत आहेत. महापालिकेने सर्वंकष कृती आराखडा त्वरित पूर्ण करावा. त्यामुळे पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढेल, त्याद्वारे मुबलक प्रमाणात पाणीही मिळेल. तसेच खासगी टँकरलाही आळा बसेल.
- राहुल पोकळे, अध्यक्ष, राष्ट्र सेवा समूह