Pune News पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही, या बद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी - MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ पासूनच लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
माहिती अधिकारातून हा संभ्रम दूर झाला असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता वर्णनात्मक पॅटर्नची तयारी सुरू करावी. एमपीएससीकडून परीक्षांचे निकाल लावण्यास दिरंगाई होत आहे. तसेच परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही. त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ लागू होण्याची शक्यता कमी आहे. हा पॅटर्न लागू करण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रंगली आहे.
यामुळे राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रामाचे वातावरण होते. त्यामुळे एका विद्यार्थ्यांने माहिती अधिकारातून ही माहिती एमपीएससीला विचारली होती. त्यावर एमपीएससीने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला आहे.
औरंगाबाद खंडपीठामध्ये शपथपत्र...
खंडपीठात आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये सुद्धा वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून लागू करण्यासंबंधी बाब अधोरेखित केली आहे. आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारा वेळ ही बाब लक्षात घेऊनच निर्णय २०२५ पासून लागू करण्यासंबंधी आयोगाने निर्णय घेतला ही बाब नमूद केलेली आहे. २०२४ मध्ये होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असणार आहे.